ग्रामदैवत नागेश्वर यात्रा उत्सवाच्या निमित्ताने स्वर्गीय विष्णू वस्ताद काशीद प्रतिष्ठानच्या वतीने उद्या मंगळवार दि 22 रोजी राज्यस्तरीय मैदानी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन केले असून या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील नामांकित मान्यवरांसह आमदार व खासदारांची उपस्थिती लागणार असल्याची माहिती स्वर्गीय विष्णू वस्ताद काशीद प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय (दादा) काशीद यांनी दिली.
एकवीस वर्षांपासून जामखेडला नागपंचमीच्या यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता राज्यस्तरीय कुस्तीचे मैदान भरविले जाते या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील यशवंताचा गौरवही केला जातो. या वर्षाच्या कुस्ती मैदान फडाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जामखेड येथे भरविले जाणारे कुस्तीचे राज्यस्तरीय मैदान स्वर्गीय विष्णू वस्ताद काशीद ऊर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ यांचे धाकटे बंधू उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशिद यांच्या संकल्पनेतून मराठी भाषीय संघ अध्यक्ष (म.प्र.) व मराठा गौरव युवराज भाऊ काशिद व अजय (दादा) काशीद यांच्या पुढाकारातून आणि योगदानातून भरविला जातो.
शहरातील ल. ना होशिंग विद्यालयात उद्या होणाऱ्या कुस्त्यांसाठी आकर्षक आसे स्टेजवर लाल मातीचे मैदान करण्यात आले आहे. काशीद कुटुंबाने कुस्तीला पाठबळ मिळावे, ग्रामीण भागातील पहिलवानांना कुस्ती खेळण्याचे आपले नैपुण्य दाखविण्याकरिता चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कुस्तीची उंची आणि सन्मान त्यांच्या माध्यमातून एकवीस वर्षांपासून केला जात असून जामखेडच्या यात्रा उत्सवाला धार्मिकते बरोबरच क्रीडा क्षेत्राची सांगड मिळाली आहे.