श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त
बुधवारपासून जामखेडला नामसाप्ताहास प्रारंभ
जामखेड (प्रतिनिधी)
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त बुधवार दी.१६ ऑगस्टपासून येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा सोमवारी ( दि.२१ ऑगस्ट )
होईल. अशी माहिती श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे यांनी दिली.

जामखेड -खर्डा रस्त्यावर वैतरणा नदीतीरावर श्रीनागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शके११४४ मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचा उल्लेख येथे आहे.त्या काळातील शास्त्रयुक्तपद्धतीने केलेले दगडी काम आजही सुस्थितीत आहे. उत्तराभिमुख असलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात काळी पाषाणाची पिंड आहे. पिंडीवर भगवान शंकराचा मुखवटा व नागाचा फडा आहे. समोर नंदी व पितळी भव्य त्रिशूळ आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला औदुंबर व उजव्या बाजूला पुरातन काळातील काही साधूंच्या समाधी आहेत.

श्रावण शुद्ध पंचमीला (नागपंचमी) या ग्रामदेवतेची यात्रा असते. या उत्सवाच्या निमित्ताने येथे १६ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताहातील किर्तने
१६ ऑगस्ट ज्ञानेश्वरी महाराज बोराटे जामखेड
१७ ऑगस्ट कैलास महाराज भोरे देवदैठण
१८ ऑगस्ट हरी महाराज खुणे पाथरुड
१९ ऑगस्ट अजिनाथ महाराज निकम शेवगाव
२० ऑगस्ट अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
२१ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
२२ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये,
२३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.

पालखी सोहळा
सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी पालखी मिरवणूक होईल. ज्यांच्या संकल्पनेतून 2004 साली श्रीनागेश्वर पालखी सोहळा सुरू झाला ते यजमान संतोष बारगजे व सौ. सविता संतोष बारगजे यांच्या हस्ते २० वर्षानंतर पुन्हा यावेळी
श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सप्ताह समितीची श्री नागेश्वर येथे नुकतीच बैठक झाली यावेळी या कार्यक्रमाची पहिली कार्यक्रम पत्रिका श्रीनागेश्वराला अर्पण करण्यात आली व कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी सप्ताह समितीचे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, बाबासाहेब खराडे, संतोष बारगजे, दिलीप कुमार राजगुरू तसेच श्रीनागेश्वर भजनी मंडळाचे दादासाहेब महाराज सातपुते, मृदंगाचार्य जगन्नाथ महाराज धर्माधिकारी(मेजर),शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, भाऊसाहेब आजबे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील , आप्पा वडेकर, रघुनाथ शेळके, ज्योती महादेव माळी, रूपाली ज्ञानेश्वर बोराटे श्रीमती. इंदुबाई बारगजे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here