गणेश कारखाना निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव; थोरात-कोल्हे गटाची सत्ता

राहता – भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. कोपरगावच्या संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष भाजपचे नेते विवेक कोल्हे यांच्याशी युती करून थोरात यांच्या गटाने ही निव़डणूक लढवत १९ पैकी १९ पैकी १८ जागांवर आघाडी घेत विखे यांना धक्का दिला आहे.

राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी शनिवारी (दि.१७) मतदान झाले होते. सोमवारी (दि.१९) सकाळपासून राहाता तहसील कार्यालय येथे मतमोजणी सुरु झाली. यामध्ये १९ पैकी १८ जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करत आहेत. फक्त एका जागेवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखान्यातील सत्ता संपुष्टात आली आहे. हा विखे पाटील यांना धक्का आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकत्रित पॅनल असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या पॅनलचे उमेदवार सर्वच गटात पुढे आहेत.

गणेश कारखाना सध्या विखे पाटील यांच्या प्रवरा कारखाना व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे. सभासदांनी मात्र निवडणुकीच्या माध्यमातून हा कारखाना विखे पाटील यांच्या ताब्यातून काढून घेतला आहे. विखे आणि कोल्हे हे भाजपमध्येच आहेत. मात्र कारखाना निवडणुकीवरून नगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भाजपमध्ये उभी फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. थोरात व कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलला १९ पैकी १८ जागा मिळाल्याने दोन्ही समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालांची उधळण करून जल्लोष साजरा करण्यात आला.

आ.निलेश लंके पोहोचले थेट राहत्यात

“ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दारूण पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे; तर विखे यांच्या विरोधातील बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलला १८ जागावर विजय मिळवला आहे. त्यानंतर आमदार निलेश लंके थेट राहत्यामध्ये पोहोचले असून त्यांनी सर्व सभासद मतदारांचे आभार मानले आहेत.

विखे पाटील यांच्या पराभवाबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले, खऱ्या अर्थाने दहशतवादाला राहत्यातील जनतेनेच मूठमाती दिली आहे. ही परिवर्तनाला खरी तर सुरुवात झाली आहे. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले आहेत. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील यांचा झालेला पराभव म्हणजे विखे पाटील यांच्या दडपशाहीला फुलस्टॉप असल्याचेही लंके यांनी म्हटले आहे. तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले पार्सलही परत पाठवणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

यापूर्वीच्या भाषणाचा उल्लेख करत लंके म्हणाले की, निलेश लंके यांना आमदार व्हायची इच्छा दिसत नाही असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर लंके म्हणाले, मला आमदार करायचं का नाही ते जनता ठरवेल? परंतु तुमच्या मुलाला खासदार करायचे की नाही? ते आता आम्ही ठरवू असा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here