जामखेडच्या अलका जाधव यांना राज्यस्तरीय कर्तुत्वान महिला पुरस्कार प्रदान.

जामखेड (प्रतिनिधी) :- जामखेड येथील अंबिका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्राच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अलका हिराबाई जाधव यांना नाशिक येथील विचार जागर फाउंडेशन व कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय कर्तुत्वान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विचार जागर फाउंडेशन व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिनबंधूकार नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते डॉ रागिणी आहेर, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती वानखेडे, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाचे सचिव राजू नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, स्वतःला, कुटुंबाला तसेच आपला भोवताल घडवून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या भगिनी असलेल्या अलका हिराबाई जाधव यांनी जामखेड मध्ये कोल्हाटी या पारंपारिक नृत्य कलावंतांच्या पोटी जन्म घेतला. आपल्या कलेच्या जोरावर समाजातील कलावंत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मसन्मान मिळवून दिला. त्याचबरोबर कलेतून मिळणाऱ्या पैशातून आपले कुटुंब उभे करण्याबरोबरच समाजातील लोक कलावंत, ऊस तोडणी कामगार, वीट भट्टी कामगार, तमाशा कलावंत, अनाथ, निराधार, वंचित व आदिवासी, भटके विमुक्त कुटुंबातील गरीब मुला मुलींच्या निवासी शिक्षणासाठी निवारा बालगृह उभे करण्यासाठी विशेष योगदान दिले.

जामखेड बीड रोडवर जामखेड पासून ७ किलोमीटर अंतरावरील मोहा फाटा येथे त्यांनी निवारा बालगृहाची उभारणी केली. तिथे सध्या ७५ अनाथ, निराधार मुले निवासी शिक्षण घेत आहेत. अलका जाधव यांच्या या असामान्य कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय कर्तुत्वान महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जेष्ठ संपादक उत्तम कांबळे, प्रशांत पवार, प्रा. किसन चव्हाण, ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here