आदर्श मातांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कैतुकास्पद- प्रकाश पोळ
शिष्यवृत्तीधारक ४ विद्यार्थ्यांस लोकसहभागातून केले ‘सायकलींचे’ वाटप
जामखेड (प्रतिनिधी) आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात शालेय जीवनापासून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणे व देशाचा सुजाण नागरिक घडणे यासाठी संघर्षावर मात करून यशाला गवसणी घालणा-या श्रीमती विमलताई घोलप यांच्यासारख्या आदर्श मातांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यांसारखे उपक्रम प्रत्येक शाळेत आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे,असे मत जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटविकास अधिकारी मा.श्री.प्रकाश पोळ यांनी तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे संपन्न झालेल्या माता पालक मेळाव्यात व्यक्त केले.
जामखेड येथे नुकत्याच मूळचे महागाव ता.बार्शी जि.सोलापूर येथील व सध्या झारखंड राज्यात आय.ए.एस.अधिकारी असलेले मा.श्री.रमेश घोलप यांच्या मातोश्री श्रीम.विमलताई गोरख घोलप यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत ‘आदर्श माता’ पुरस्काराने शाळेतर्फे सन्मानित करण्यात आले.
यावेळी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या ज्ञानेश्वरी शिंदे ,प्रेरणा भांडवलकर ,स्वामिनी कुमटकर आणि विराज धुमाळ या विद्यार्थ्यांचा सायकल वाटप करून तर जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या हर्षवर्धन धुमाळ, आशिता सोनवणे, अनुष्का शिंदे,विराज जेधे, शिवांश पवार ,अवधुत लोहार,शुभम फुलमाळी, शंभूराज शिंदे व विद्या मुरूमकर यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
नुकत्याच दत्तवाडी, बोर्ले, काकडेवस्ती व चव्हाणवस्ती या चार शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या संपन्न झालेल्या संयुक्त शैक्षणिक सहलीच्या अनुभवांवर आधारित चारही शाळांच्या वतीने विद्यार्थी व पालक अशा दोन गटांत निबंध स्पर्धा संपन्न झाली.
श्रीम. विमलताई घोलप यांच्या अतुलनीय जिद्दीचा प्रेरणादायी जीवनप्रवास त्यांचे चिरंजीव मा. श्री.उमेश घोलप यांनी अतिशय प्रभावीपणे मांडला. जालना जिल्ह्यातील श्रीरामतांडा शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्याचे प्रथम बालरक्षक मा.श्री.जगदीश कुडे सर यांनी सत्यघटनाधिष्ठीत ‘दिव्यांग विजूची कथा’ व राज्याला दिशादर्शक ठरलेली ‘श्रीरामतांड्याची यशोगाथा’ सांगत असताना सर्व मंत्रमुग्ध झाले होते.
यावेळी माता पालक मेळाव्याच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ व लकी ड्राॅचे आयोजन करण्यात आले. त्यात सौ. सीताबाई काकडे, सौ.अंजली जेधे, श्रीम. अरूणा औटी आणि सौ. सोनाली येवले यांना अनुक्रमे पैठणी साडी, पंचधातूंची दत्तमूर्ती, टेबल फॅन व पाण्याचा जार या भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.बाबासाहेब कुमटकर होते ,तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व वरवंडी तांडा जि.औरंगाबाद येथील उपक्रमशील शिक्षक भरत काळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार, सूत्रसंचालन काकडेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक विजय जेधे व कु. संस्कृति जोशी तर आभार प्रदर्शन दत्तवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक हरिदास पावणे यांनी केले.