पुण्यावरून भाऊबीजेला गावी निघालेल्या जामखेडच्या तरुणास अज्ञात वाहनाने उडवले, एक ठार एक जखमी
जामखेड नगर रोडवरील चार दिवसात दुसरी घटना
जामखेड प्रतिनिधी
भाऊबीजीसाठी पुण्यावरून आपल्या जामखेड तालुक्यातील गावाकडे मोटारसायकल वर जात असतांना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जामखेड च्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्या व्यक्तीला अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील मयत तरुण आदेश कीसन काळे हा गेल्या काही वर्षांपासून पुणे येथील एका कंपनी मध्ये कामाला होता. दर वर्षी प्रमाणे तो आपल्या एका मित्रासह भाऊबीजेच्या निमित्ताने बुधवार दि २६ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुण्यावरून गावाकडे जात असतांना आष्टी तालुक्यातील चिंचपूर जवळील वळणावर अज्ञात वाहनाने पाठिमागून धडक दिल्याने बुलेट मोटार सायकल एमएच १२ पीएक्स ६७२८ यावरील आदेश किसन काळे (वय ३२) रा. धनेगांव ता.जामखेड हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र नवनाथ मच्छिंद्र काळे (वय ३६) रा.मोशी,ता.हावेली,जि.पुणे हा गंभीर जखमी झाला आहे. मयत आदेश काळे याच्या आष्टी येथिल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आसुन सदरचा त्याच्यावर त्याच्या मुळ गावी धनेगाव या ठीकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती माजी सरपंच भरत (बप्पा) काळे यांनी दिली आहे.
तसेच या अपघातात त्याचा दुसरा मित्र गंभीर जखमी झाला त्यास अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पो.हे.काॅ.विकास राठोड यांनी पंचनामा केला असून,पुढील तपास पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड हे करत आहेत.
चार दिवसातील दुसरी घटना
गेल्या चार दिवसापुर्वीच पुण्यावरून परभणी येथे दिवाळी साठी जात असलेल्या तरूणांचा आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा येथे अपघात होऊन मृत्यू झाला होता.या घटनेला चार दिवस होते ना होतेच आज पुन्हा दुसरी घटना घडली आहे.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.