जामखेड प्रतिनिधी

कर्जत-जामखेड मतदारसंघातील माजी आमदार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आज सकाळी त्यांनी सोशल मीडियातून एका गोष्टीकडे लक्ष वेधत राज्य सरकार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रा. शिंदे यांनी म्हटले आहे, मी (८ जूनला) भारतीय जनता पार्टीतर्फे विधान परिषदेसाठी फॉर्म भरला आहे. काल कर्जत-जामखेडमध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस पडला. पावसाळा (७ जून नंतर) सुरू झाला आहे. पण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना कुकडीच्या आवर्तनाची गरज असताना पाणी सुटले नाही. परिणामी बरीच उभी पिके जळाली. फळबागांचेही नुकसान झाले. काही ठिकाणी बागा जळाल्या. पण काल असे समजले की कुकडीचे आवर्तन सुटणार आहे. मग याला काय समजावे? योगायोग, नियोजन, की परिणाम………..?

कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुटणे हा ज्वलंत प्रश्न असतो. उन्हाळ्यात त्याची जोरदार मागणी होत असते. यापूर्वी शिंदे यांनी या प्रश्नावर तीव्र आंदोलनेही केली आहेत. यावर्षीही पाऊस लांबल्याने पाणी सोडण्याची मागणी होत होती. मात्र, त्याचा निर्णय होत नव्हता. ते सोडण्याचा निर्णय, त्याच दिवशी आलेला पाऊस आणि शिंदे यांचा उमेदवारी अर्ज यांचा संबंध जोडून शिंदे यांनी लिहिलेली ही पोस्ट चर्चेत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत शिंदे यांच्याशी सहमती दर्शविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here