जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील मोहा या ग्रामीण भागातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक बनण्याचा मान मनिषा सुरेश वाघमारे हीला मिळाला. सन 2019 साली झालेल्या एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला.

त्यानिमित्ताने मोहा ग्रामस्थांच्या वतीने मोहा गावातून भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच शिवाजी डोंगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य भिमराव कापसे, पंडित गायकवाड, सुरेश वाघमारे सर, सुनिल वाघमारे सर, हनुमंत वाघमारे, शिवाजी माने, विकास सांगळे, आदींसह गावातील इतर अधिकारी, पदाधिकारी, संपुर्ण वाघमारे परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनिषा वाघमारे हीने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा या शाळेत पुर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण प्रदीपकुमार महादेव बांगर उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या ठिकाणी घेऊन नंतर ल. ना. होशिंग विद्यालयात काॅलेजचे शिक्षण पूर्ण केले. नंतर डि. टी. एड्. हि पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी भेटली नाही म्हणून शिक्षण सोडून न देता पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणाहून पदवीधर हि पदवी प्राप्त केली आहे. सध्या बी. एड् या पदवीचे शिक्षण सुरू असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली व पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक बनण्याचा मान मिळवला.
मनिषा वाघमारे हीने बोलताना सांगितले की, माझ्या कुटुंबातील सर्वांची इच्छा होती की मी खुप शिकुन मोठी अधिकारी व्हावे. या सर्वांची स्वप्नपुर्ती करण्यासाठी मी सन 2017 पासून एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. सुरूवातीला अभ्यास सुरू करत असताना अनेक अडीअडचणींना व समस्यांना मला तोंड द्यावे लागले. त्या गोष्टींनी खचून न जाता अधिक जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. जिथे वेळ मिळेल तिथे फक्त अभ्यास हेच ध्येय ठेवून कोणतेही क्लास किंवा अभ्यासिका न लावता पुणे येथील काॅलेज आॅफ अॅग्रिकल्चर मधील पार्किंग मध्ये बसून अभ्यास केला. सन 2019 साली एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला व परिक्षेत चांगले गुण मिळवत पोलिस उपनिरीक्षक या पदाला पात्र झाले. पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या शारीरिक चाचणीची तयारी करण्यासाठी पुणे येथील दादासाहेब भोरे सरांच्या अॅकॅडमीत तयारी केली. त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाच्या जोरावर मी महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवू शकले.

या सर्व यशामागे माझे आई वडील माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे यश मिळवणे मला सोपे गेले. या सर्वांचा आशिर्वाद व मला माझ्या प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत घडवणाऱ्या सर्व गुरूंच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करू शकले. आज माझ्या निवडीबद्दल माझ्या गावातील नागरिकांनी माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here