‘लंपी स्किन’ रोग प्रतिबंधक लसीकरण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
बारामती ऍग्रोकडुन ५० हजार लसींचा पुरवठा;
जामखेडसाठी २३ हजार तर कर्जतसाठी २७ हजार डोस.
जामखेड प्रतिनिधी
बारामती ऍग्रो लिमिटेड,कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने व आ.रोहित पवार यांच्या सौजन्याने जनावरांसाठी लंपी स्किन रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम व मार्गदर्शन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये ‘लंपी स्किन’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे.कर्जत व जामखेड तालुक्यात एकूण २ लाख २७ हजार एवढे पशुधन आहे ,पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार कालपर्यंत कर्जतमध्ये १२१८ तर जामखेड मध्ये २०४ केसेस सापडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता घाबरून गेला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्जत येथे भाग्यतारा मंगल कार्यालयात व जामखेड येथे महावीर मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना रोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या आजाराबाबत अधिक मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील तज्ञ मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. यामध्ये बारामती ऍग्रोचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. दिनेश औटी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे डॉ.व्ही.डी.अहेर यांनी ‘लंपी स्किन आजाराची ओळख’ याविषयी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.ए.यु.भिकाने यांनी ‘लंपी आजाराची कारणे, लक्षणे,उपचार व प्रतिबंधक उपाय’ यावर ऑनलाईन मार्गदर्शन केले. पुणे येथील रोग तपासणी विभागाचे आयुक्त डॉ. लिमये यांनी ‘लंपी स्किन आजार परीक्षण व निदान’ यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. पुणे येथील जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ.बी.एन.शेळके यांनी ‘लंपी स्किन आजाराचे भविष्यातील दुष्परिणाम’ यावर सखोल माहिती दिली. नगर जिल्ह्याचे पशु आरोग्य अधिकारी डॉ.तुंबारे यांनी ‘लसीकरण मोहीम व अंमलबजावणी योजना’ यावर चर्चा केली.बारामती ऍग्रो लिमिटेडचे अध्यक्ष तथा ऍग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी उपस्थितांना ‘लंपी स्किन आजाराचे लसीकरण व कर्जत व जामखेड मधील दूध उत्पादन विकासासंदर्भात मार्गदर्शन केले.मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर चर्चासत्र घेण्यात आले या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रश्नांचे निरसन करून घेतले.
______________________________
चौकट
बारामती ऍग्रोच्या वतीने ५० हजार लस उपलब्ध
हंपी रोगावर लसीकरण हाच उपाय असल्याने व सध्या लसीचा तुटवडा असुन व पुढील काही काळ हा तुटवडा राहण्याची शक्यता आहे.बारामती ऍग्रोच्या माध्यमातून तात्काळ ५० हजार लसींचा स्टॉक मागवण्यात आला असुन २३ हजार डोस जामखेडसाठी तर २७ हजार डोस कर्जतसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.ज्या गावांमध्ये आत्तापर्यंत रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही अशा गावांमध्ये रोग प्रतिबंधासाठी लसीकरण करायचे आहे.






