

शिक्षणाच्या मंदिरात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार! हळगाव येथिल कृषी महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांसह इतरांवर गुन्हे दाखल
जामखेड प्रतिनिधी
रेक्टरकडे तक्रार केल्याच्या कारणावरून काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थींच्या रुमची कडी तोडुन रुममध्ये जाऊन काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण व रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड तालुक्यातील हळगाव येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय येथील वसतिगृहात घडला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला चार विद्यार्थीसह इतर काही अनोळखी विद्यार्थ्यांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कृषी महाविद्यालयातील ऋतीक दत्तात्रय शेळके, पियुष कुंभार, ( पुर्ण नाव माहित नाही) सुशील हेमंत मालकाने आणि प्रतिक कुमार वाघमोडे (पुर्ण नाव माहीत नाही) या चार विद्यार्थ्यांसह इतर अनोळखी मुलांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्यार्थी वेदान्त दगडु तळुले (वय १८, रा. निमगाव धाना, भाळवणी ता. जि. अहिल्यानगर) याचे काही दिवसांपूर्वीच या कृषी महाविद्यालयात बी एस सी एग्रीसाठी नंबर लागला असल्याने पहिल्या वर्षीसाठी ॲडमीशन घेतले आहे. दि ७ सप्टेंबर रोजी फीर्यादी विद्यार्थी व त्याचे काही मित्र होस्टेल वरील रुममध्ये झोपलेले असताना त्या ठिकाणी सिनियर मुलांनी या मुलांच्या रुममध्ये जाऊन त्यांच्या रुम मध्ये येण्यास सांगितले. फीर्यादी व त्याचे मित्र सिनियर मुलांच्या रुम मध्ये गेल्यावर या मुलांना रांगेत उभे करुन खाली वाकुन पहाण्यास सांगितले, तसेच आम्ही सांगु तसे वागावे लागेल असे म्हणुन रॅगिंग केली. यानंतर घडलेला प्रकार फीर्यादी याने हॉस्टेलचे रेक्टर यांना सांगितला रेक्टर यांनी मुलांना समजावून सांगितले व सर्वांना आपल्या रुम मध्ये पाठवले.

यानंतर याच दिवशी मध्यरात्री ७ व ८ सप्टेंबर रोजी फीर्यादी व त्याचे मित्र वसतिगृहातील आपल्या खोलीत झोपलेला असताना वरील आरोपींनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी काठी, लाथाबुक्क्यांनी फिर्यादी वेदांत तळुले याच्या हातावर, पाठीवर, पोटात व डोक्यात मारहाण करून जखमी केले.
“तु रेक्टर कुलकर्णी यांना फोन करून आमची तक्रार का केलीस?” असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ केली. तसेच “तुला कॉलेजात शिक्षण घ्यायचे असेल तर आम्ही सांगू तसेच वागावे आणि राहावे लागेल,” अशी धमकी देत दमदाटी केली. यानंतर फीर्यादी याने याबाबत ११२ वर कॉल करुन पोलीसांना ही माहिती दिली पोलीस देखील घटनास्थळी आले होते. फीर्यादी याने घडलेला सर्व प्रकार त्याच्या पालकांना सांगितला पालक देखील तातडीने कॉलेजवर आल्यावर जखमी मुलास घेऊन आहील्यानगर येथिल सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.

रॅगिंग च्या या घटनेमुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेची जबाबदारी असताना देखील हा प्रकार घडला आहे. केवळ गुन्हेगार विद्यार्थ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर या संपूर्ण प्रकारात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या महाविद्यालयीन प्रशासन व जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
याप्रकरणी पिडीत विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा १९९९ च्या कलम ४ अंतर्गत वरील आरोपीन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करित आहेत.









