


मुलासह आईच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा
आईसह दिड वर्षाच्या मुलाचा विहिरीत आढळला होता मृतदेह
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे दिड वर्षाच्या मुलासह आईचा एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करा तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा विवाहीतेच्या नातेवाईकांनी घेतला होता. अखेर मयत विवाहितेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती सह एकुण पाच जणांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती शिवाजी अंगद चौरे, सासरा अंगद दशरथ चौरै, सासु विजुबाई अंगद चौरे, दिर धनंजय अंगद चौरे, भावजय कमल धनंजय चौरे, सर्व रा. वांजरवाडी ता. जामखेड, जिल्हा. अहिल्यानगर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे सोमवार दि ११ रोजी एका विहिरीमध्ये. साळू शिवाजी चौरे (वय २४) आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा विवांश शिवाजी चौरे या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. फिर्यादीनुसार, विवाहानंतर काही महिन्यांपासून साळु यांना सासरच्या मंडळींकडून सतत छळ सहन करावा लागत होता. शेतीच्या कामात व घरकामात हातखंडा नसल्याचे कारण देत त्यांच्याकडून मानसिक दबाव, मारहाण व अपशब्दांचा समावेश असलेला त्रास दिला जात होता. या सततच्या छळाला कंटाळून साळु हिने मुलाला घेऊन आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेतील चार आरोपींना तत्काळ खर्डा पोलीसांनी अटक केलेली आहे.
सदरची कारवाई सपोनि उज्वल सिंह राजपूत, पोलीस अंमलदार, राईस सय्यद, संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, शशी म्हस्के, गणेश बडे, यांनी केली आहे.

चौकट
खर्डा पोलीस स्टेशनसमोर मयताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांचा मोठा जमाव जमला होता. “गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यविधी करणार नाही,” असे मयताच्या कुटुंबीयांनी पवित्रा घेतला होता. पोलिसांनी रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवला, ज्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.




