शहाजी राजेभोसले यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर पाचव्या दिवशी मागे

नान्नज ग्रामस्थांचा गावबंद, महिलांचा कॅंडल मार्च अन् रास्तारोको; आंदोलन ठरले लक्षवेधी

जामखेड प्रतिनिधी

नान्नज गावातील प्रलंबित प्रश्नांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. या उपोषणाला नान्नज ग्रामस्थांनीही मोठा पाठिंबा देत गावबंद, महिलांचा कॅंडल मार्च तसेच रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे शहाजी राजेभोसले यांचे हे उपोषण विशेष लक्षवेधी ठरले.

जामखेड तालुक्यातील नान्नज गावातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी शहाजी राजेभोसले यांनी ७ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मंगळवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. नान्नज परिसरात आवश्यक नागरी सुविधांचा अभाव असून रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ, महिला तसेच विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नान्नज येथे सुसज्ज नवीन बसस्थानक उभारणे ही प्रमुख मागणी असून, या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह तसेच नागरिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आहे. तसेच नान्नज येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. ग्रामस्थांच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी नान्नज गावात गावबंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर सायंकाळी गावातील महिलांच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. या कॅंडल मार्चमध्ये महिलांसोबतच शालेय विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी नान्नज येथील जामखेड-कर्माळा मार्गावर ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष नान्नजच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, मंगळवारी दुपारी प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे व मंडळ अधिकारी इकडे मॅडम यांच्या मध्यस्थीने शहाजी राजेभोसले यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रशासनाने विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर शहाजी राजेभोसले यांनी आपले उपोषण मागे घेतले.

या उपोषणास, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुल उगले, आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, उबाठा गटाचे शिवसेना शहराध्यक्ष भरत मोहळकर, डॉ. बाबासाहेब कुमटकर, भुजंग दळवी, माजी चेअरमन इन्नुसभाई पठाण, अंकुश मोहळकर, गणी पठाण, लाला शेख, चेअरमन आप्पा मोहळकर, अजय राजपूत, पोपट क्षीरसागर, अस्लम शेख, नितीन पाद्रे, नागनाथ मोहळकर, नवनाथ पाचारणे, अमर चाऊस, सतीश साळवे व राखा गोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. उपोषण सोडतेवेळीही हे मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here