

शेतीच्या जमिनीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
शेतीच्या जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादातून पिता-पुत्राला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना फाक्राबाद, ता. जामखेड येथे दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी घडली. याप्रकरणी शांतीलाल पांडुरंग जायभाये (वय ४९, धंदा शेती, रा. फाक्राबाद, ता. जामखेड) यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी शांतीलाल जायभाये हे पत्नी लताबाई व मुलगा तुकाराम यांच्यासह ते फाक्राबाद येथे राहतात. शेतीच्या कारणावरून त्यांचा भाऊ सुरेश पांडुरंग जायभाये व महादेव पांडुरंग जायभाये यांच्यासोबत यापूर्वीही वाद झाले होते. यानंतर दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शांतीलाल जायभाये हे घरी असताना त्यांचा भाऊ सुरेश पांडुरंग जायभाये, महादेव पांडुरंग जायभाये व तनेश सुरेश जायभाये, सर्व रा. फाक्राबाद, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, हे तेथे आले. त्यांनी शांतीलाल यांच्याकडे शेतीची जमीन वाटून देण्याची मागणी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी शांतीलाल यांचा मुलगा तुकाराम हा शिवीगाळ करू नका, असे सांगत असताना आरोपी सुरेश पांडुरंग जायभाये व तनेश सुरेश जायभाये यांनी त्याच्या हातातील लाकडी काठीने तुकारामच्या डाव्या हाताच्या मनगटावर व उजव्या डोळ्याच्या वर तसेच डाव्या हाताच्या चोटावर मारहाण करून त्याला दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शांतीलाल यांनाही महादेव पांडुरंग जायभाये यांनी जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भांडणाचा आवाज ऐकून घराजवळ राहणारे बाळासाहेब सुखदेव जायभाये, सुनील गहिनीनाथ जायभाये व अर्जुन मेघाजी मिसाळ यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.

दरम्यान, सुरेश पांडुरंग जायभाये व महादेव पांडुरंग जायभाये यांनी पुन्हा तनेश सुरेश जायभाये याला तेथून घेऊन जात असताना, “परत जर आमचे नादी लागला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. या प्रकरणी शांतीलाल पांडुरंग जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश पांडुरंग जायभाये, महादेव पांडुरंग जायभाये व तनेश सुरेश जायभाये यांच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. सलिम शेख हे करित आहेत.









