जामखेडमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तीन जणांवर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील खर्डा चौक परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर कोयता व वीटाने जीवघेणा हल्ला करून त्याच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामखेड एकुण तीन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकिब इलाही आत्तार (वय २६, रा. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता शहरातील खर्डा चौक येथील एका चहाच्या दुकानासमोर मोटारसायकलवर बसले होते. यादरम्यान गुड्डू खान (पूर्ण नाव माहिती नाही), आमीर तैमुर खान व समीर तैमुर खान हे तेथे आले. यावेळी आमिर तैमुर खान याने फिर्यादीस, “तू आमच्याकडे रागाने का पाहतोस?” अशी विचारणा केली. त्यावर याच कारणामुळे वाद निर्माण झाला. त्याचवेळी (गुड्डू खान पुर्ण नाव माहित नाही) याने हातातील नारळ सोलण्याच्या कोयत्याने फिर्यादी आकिब इलाही आत्तार याच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतली.

फिर्यादी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना आमिर तैमुर खान व समिर तैमुर खान यांनी हातातील वीटाने पाठीवर मारहाण केली या मारहाणीत फीर्यादी हा गंभीर जखमी झाला. तसेच, “आमच्या नादी लागलास तर तुझे तुकडे करू,” अशी धमकी दिली. झटापटीदरम्यान फिर्यादीचा मोबाईल फोन देखील गहाळ झाला आहे.

या घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी समिर तैमुर खान (वय ३८, रा. सदाफुले वस्ती, जामखेड) हा जामखेडमध्ये असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याघटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शिवाजी कदम हे करित आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here