


नगर – सोलापूर रोडवरील आपघात जामखेडच्या दोघांचा मृत्यू
रुईछत्तीशी जवळ तीन मित्रांचे चारचाकी वहान पलटी
जामखेड प्रतिनिधी
नगर सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी जवळील अंबीलवाडी येथील हायवेवर चारचाकी वाहन पलटी होऊन जामखेडच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या आपघातात एक जण कीरकोळ जखमी झाला आहे. घटनेने जायभाय व डुचे या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ॲड विराज भगवान जायभाय, वय अंदाजे २४ वर्षे रा. शिक्षक कॉलनी, व ऋषिकेश (सोनु) बाळासाहेब डुचे, वय २३ वर्षे, रा तपनेश्वर गल्ली, जामखेड अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भगवान जायभाय यांचे सुपुत्र ॲड. विराज जायभाय हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. त्यांच्या मोठ्या भावाच्या विवाहासाठी ते जामखेड येथे आले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर दि. ११ रोजी रात्री विराज जायभाय, ऋषिकेश (सोनू) डुचे व पुणे येथील एक मित्र असे तिघेजण वहान क्रमांक एम. एच १७, ए. झेड – ३२४२ या चारचाकी वहानाने अहिल्यानगर या ठिकाणी जात होते. त्यांचे वहान नगर सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी जवळील अंबीलवाडी येथे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आले असता वळणावर अंदाज न आल्याने भरधाव वहानाने रस्ता सोडुन शेतात घूसली व दोन तीन पलट्या मारल्या व भिषण आपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये विराज जायभाय व ऋषिकेश (सोनु) डुचे या दोघांचा मृत्यू झाला तर पूणे येथील त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला.

यानंतर किरकोळ जखमी झालेला त्यांचा मित्र हा महामार्गावर आला व नंतर जामखेड येथील त्यांच्या नातेवाईकांना फोनवर आपघाताची माहिती दिली. यानंतर बाजुच्या परीसरातील लोकांनी देखील मयत झालेल्या दोघांना बाहेर काढण्यास मदत केली. दोन्ही तरूणांच्या मृतदेहावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी दोघांवर जामखेड येथील आमरधाम येथिल स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चौकट
जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भगवान जायभाय यांचे सुपुत्र मयत ॲड. विराज भगवान जायभाय हे आहेत. ॲड. विराज भगवान जायभाय व ऋषिकेश (सोनु) डुचे यांना जामखेड तालुका वकील संघाने श्रद्धांजली वाहिली तसेच दुःखात सहभागी होत एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा ठराव मंजूर करून निर्णय घेतला होता.








