जामखेड नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे केले नुकसान

सौर ऊर्जा कंपनीच्या ठेकेदार व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

सौर ऊर्जा कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलचे काम करीत असताना जामखेड नगरपरिषदेची सार्वजनिक शासकीय मालमत्ता असलेल्या भूमिगत गटरच्या पाईपलाईन व गटारीचे चेंबर फोडून अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी इलेक्ट्रिकल्स ठेकेदार ए. एन. सावरे व व्यवस्थापक दत्ताजय मदने यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जामखेड नगरपरिषदेचे लिपीक वलीमहंमद रशिद सय्यद (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १५ जुलै रोजी सागर टकले यांनी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना फोनद्वारे माहिती दिली की, सौर ऊर्जेच्या इलेक्ट्रिकल्स ठेकेदार ए. एन. सावरे व व्यवस्थापक दत्ताजय मदने हे त्यांच्या कंपनीचे लाईटचे पोल बसविण्याचे काम करत असताना जामखेड शहरातील आरोळेवस्ती येथील समता तरुण मंडळ कमानीजवळ शासकीय मालमत्तेतील भूमिगत गटरची पाईपलाईन व गटारीचे चेंबर फोडत आहेत.

या माहितीची दखल घेत मुख्याधिकारी अजय साळवे यांनी लिपीक वलीमहंमद सय्यद यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ते सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी गेले असता संबंधित ठेकेदार व व्यवस्थापक हे इलेक्ट्रिक पोलचे काम करत असताना जामखेड नगरपरिषदेची सार्वजनिक/शासकीय मालमत्ता असलेल्या भूमिगत गटरच्या पाईपलाईन व गटारीचे चेंबर फोडून नुकसान करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारात भूमिगत गटर पाईपलाईन व चेंबरचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी जामखेड नगरपरिषदेचे लिपीक वलीमहंमद रशिद सय्यद (वय ४१, व्यवसाय- नोकरी, रा. नुराणी कॉलनी, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इलेक्ट्रिकल्स ठेकेदार ए. एन. साखरे (रा. किर्लोस्कर सोसायटी, महादेवनगर, मांजरी रोड, ता. हवेली, जि. पुणे) तसेच व्यवस्थापक दत्ताजय मदने (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ अन्वये जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दरारथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here