जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलणार – बाबुशेठ टायरवाले

सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर

जामखेड प्रतिनिधी

जामखेडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नियोजनबद्ध विकासासाठी नगरविकास मंत्री तसेच माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत भरघोस निधी आणून विकास करू यामुळे निश्चितच जामखेड नगरपरिषदेवर शिवसेना झेंडा फडकवणार असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी व्यक्त केला. या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. यानंतर त्यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले.

प्रभाग चार मधील अ मधील अपक्ष उमेदवार विकी सदाफुले यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार जाहीर केले तसेच विकी सदाफुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला तशी माहिती आज शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत घेत देण्यात आली. यामुळे शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख डॉ. शबनम इनामदार, तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवा नेते आकाश बाफना, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पायलताई बाफना, संतोष वाळुंजकर, बभ्रुवान वाळुंजकर, शामिर सय्यद, नितीन कोल्हे, ऋषिकेश बांभरसे, शिवाजी विटकर, शिवकुमार डोंगरे, प्रविण बोलभट, आण्णा ढवळे यांच्या सह सर्व शिवसेना उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, शिवसेनेला निश्चितच नगरपरिषद निवडणूकीत चांगले यश मिळेल. शिवसेना नेहमी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करते तसेच शिवसेना जात पात पाळत नाही. त्यांनी विकी सदाफुले यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना युवा नेते आकाश बाफना म्हणाले की, आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते विकी सदाफुले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज आहे तेव्हा तेथे पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्यांना ज्या पक्षाकडून तिकीट हवे होते त्यांच्या कडून मिळाले नाही त्यांच्यावर अन्याय झाला आहे. शिवसेनेत त्यांचा सन्मान करण्यात येईल.

यावेळी विकी सदाफुले म्हणाले की, सभापती प्रा. राम शिंदे यांनी शब्द पालटला आणि मी निष्ठावंत असून मला टाळले व आयात उमेदवाराला तिकीट दिले माझा विश्वासघात केला. मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. पण आकाश बाफना यांचे शहराच्या विकासासाठी व्हिजन मला भावले त्यामुळे मी हा निर्णय घेतला. भाजपाने मला त्रास दिला शिवसेनेत माझा सन्मान झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here