


सामाजिक; माजी विद्यार्थ्यांनी भरवलेल्या ‘प्रतिबिंब’ स्नेहसंमेलनात रक्तदान शिबिराचा आदर्श!
२००९ सालच्या बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘प्रतिबिंब’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
जामखेड प्रतिनिधी
श्री नागेश विद्यालय आणि ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड येथील २००९ सालच्या बारावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आयोजित केलेले ‘प्रतिबिंब’ वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच अभूतपूर्व उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाचे हे चौथे वर्ष होते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जाणीव ठेवून एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

केवळ गतकाळातील आठवणींना उजाळा न देता, समाजाला काहीतरी परत देण्याच्या उदात्त हेतूने यावर्षी स्नेहसंमेलनासोबत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरभी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. तरुण, उत्साही आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण केला. तब्बल ४० हून अधिक जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला संस्थेचे आदरणीय शिक्षक अडसूळ सर, बाळासाहेब पारखे सर आणि काकडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षकांनी बॅचच्या या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाचे मनस्वी कौतुक केले.

दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे सामाजिक भान जपणारे हे ‘प्रतिबिंब’ स्नेहसंमेलन आता केवळ माजी विद्यार्थ्यांच्या भेटीचे माध्यम न राहता, समाजासाठी प्रेरणा देणारे व्यासपीठ बनले आहे. जुन्या आठवणींसोबत नवीन आणि विधायक कार्याची जोड देत, या बॅचने ‘प्रतिबिंब’ला एक नवी ओळख दिली आहे.








