बीडमध्ये भीषण अपघातात तहसीलदाराचा जागीच मृत्यू, प्रशासकीय कर्मचार्‍यांवर शोककळा

केज (जि. बीड): केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण महसूल अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनावरचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात घडला.

नियंत्रण सुटले अन् कार पलटी झाली

रेणापूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कारमध्ये राकेश गिड्डे हे एकटेच होते. पहाटेच्या वेळी वाहन वेगात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

महसूल प्रशासनाचे मोठे नुकसानघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. राकेश गिड्डे यांनी केज तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक धोरणात्मक निर्णय आणि जनहिताची कामे मार्गी लावली होती. त्यांच्या जाण्याने महसूल विभागातील एक अभ्यासू अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या रेणापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here