

अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला; दगडफेक, काठ्या मारत गाडी फोडली.
हल्ल्या प्रकरणी तीन जणांना घेतले ताब्यात
अहिल्यानगर प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके हे आज सकाळी पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे आयोजित केलेल्या ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगर शहराच्या जवळ नाश्ता करण्यासाठी थोडा वेळ थांबले. नाश्ता केल्यानंतर त्यांचा ताफा पुन्हा पुढे निघाला. ते पाथर्डीजवळ आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर पोहोचताच काही अज्ञात तरुणांनी अचानक त्यांच्या वाहनाला अडवले.
कोणतीही पूर्वसूचना न देता या तरुणांनी हाके यांच्या गाडीवर काठ्यांनी हल्ला चढवला. हा हल्ला अचानक झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीच्या अनेक काचा फोडण्यात आल्या असून, वाहनाच्या बॉडीवरही हानी झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे, ज्यामुळे ओबीसी आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असून, हल्ल्याच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके तयार करण्यात आली असून, हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा हल्ला कोणी केला, कशासाठी केला, आणि त्यामागे नेमके काय कारण होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.









