

बाईचा नादच वाईट! दीड वर्षांपूर्वी नर्तिकेच्या प्रेमात, लाखो रुपये उडवले; तिच्याच घरासमोर माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन
सोलापूर: बीड जिल्ह्यातील लुखामसला, ता. गेवराई, येथील उपसरपंचांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सासुरे, ता. बार्शी, येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रेयसी असलेल्या नर्तकीला भेटायला आलेल्या लुखामसला (ता. गेवराई) गावच्या माजी उपसरपंचाने सासुरे (ता. बार्शी) येथील तिच्याच घरासमोर कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

भेटायला येऊनही तिने कॉल न उचलल्याने त्याने जीवन संपविले. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. त्याच्या मेहुण्याच्या फिर्यादीवरून संशयित नर्तकीविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा कला केंद्रात नेहमी येत होता. सुमारे एक-दीड वर्षापूर्वी कला केंद्रामध्ये सासुरे (ता. बार्शी) परिसरातील एका नर्तकीसोबत त्याची ओळख झाली. तेथून ती पारगाव कला केंद्राकडे जाऊ लागली आणि गोविंदची मैत्री वाढली, त्यांच्यात प्रेम झाले. यातून अनेकदा त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे बर्गे यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्या तरुणीने गोविंद याच्यासोबतचा संपर्क तोडला होता, त्यामुळे तो नैराश्यात होता. त्यातून गोविंद सोमवारी (ता. ८) मध्यरात्री गेवराईवरून सासुरे गावी आला होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडल्याचेही त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.
सासुरे येथील पोलिस पाटील शीतल करंडे यांनी गावातील एका व्यक्तीच्या घरासमोर थांबलेल्या चारचाकी कारमध्ये (एमएच २३, बीएस ५०२३) एकजण मृतावस्थेत असल्याची खबर वैराग पोलिसांना दिली. त्याच्याकडे एक पिस्टल दिसत होते. वैराग पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. ज्याच्या घरासमोर गाडी होती, त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी गोविंद बर्गे हा माझ्या बहिणीस भेटण्यास आला होता, असे पोलिसांना सांगितले. मात्र, तो कधी आला याची माहिती नसून मी सकाळीच त्याला पाहिले, असेही त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.

बंदूक विनापरवाना, होती एकच गोळी
गोविंद बर्गे याने ज्या बंदुकीतून गोळी झाडून घेतली, त्यात एकच गोळी होती. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. त्याच्याकडे परवान्याची कोणतीही बंदूक नव्हती, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे असलेली विनापरवाना बंदूक कोणाची व ती कोठून घेतली, याचा शोध पोलिस घेत आहेत.





