राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रविंद्र भापकर यांची NCERT नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

जामखेड प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रविंद्र भापकर यांची “शिक्षणात डिजिटल गेम्सचा वापर” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. ही कार्यशाळा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली येथे दिनांक 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत शालेय शालेय अभ्यासक्रमानुसार डिजिटल गेम्सचा वापर कसा करावा यावर सखोल चर्चा होणार असून, विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक आनंददायी, रंजक आणि परिणामकारक कसे करता येईल यावर भर दिला जाणार आहे. या अनुषंगाने एक हस्तपुस्तिका (Handbook) तयार केली जाणार असून, त्यामध्ये विषयवार (भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, पर्यावरण) डिजिटल गेम्सचा उपयोग, अध्यापन-शिकणीत होणारे फायदे आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना यांचा समावेश असेल.

विशेष म्हणजे, भापकर सर यांनी स्वतः 20 अँड्रॉइड शैक्षणिक अ‍ॅप्सची निर्मिती केली आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित, भाषा, विज्ञान यांसारख्या विषयातील गुंतागुंतीच्या संकल्पना खेळाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने शिकता येतात. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, त्वरित अभिप्राय, स्पर्धात्मकता व प्रगती नोंद यांसारखी वैशिष्ट्ये या अ‍ॅप्समध्ये असून, त्यांचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना झाला आहे.

राष्ट्रीय ICT पुरस्कार विजेते असलेले भापकर सर हे राष्ट्रीय ICT अ‍ॅम्बेसेडर, सायबर स्पेस स्पर्धेचे राष्ट्रीय परीक्षक, महाराष्ट्र शासनाच्या थिंक टॅंकचे सदस्य, तसेच बालभारती इतिहास विभागाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, त्यांची PM eVidya DTH चॅनलच्या तांत्रिक समन्वयक पदावर निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे हे बहुमुखी योगदान देशभरातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी मानले जाते.

या निवडीबद्दल राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व अभिमान व्यक्त केला जात आहे. डिजिटल युगात अभ्यासक्रमाशी संलग्न शैक्षणिक गेम्सचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक आकर्षक व परिणामकारक करण्याच्या दिशेने भापकर सर यांचे हे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल राज्याचे SCERT चे संचालक राहुल रेखावार, अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गाशिअ प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख राम निकम आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here