कर्जत व जामखेड तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी १.५ कोटींचा निधी मंजूर

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

जामखेड प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून कर्जत तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी आणि जामखेड तालुक्यातील हळगाव, साकत, अरणगाव या सहा ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन इमारती व नागरी सुविधा केंद्र उभारण्यास सरकारने १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरचा निधी प्राप्त व्हावा याकरिता विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं आहे. या निधीमुळे गावपातळीवर दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नागरिकांना गावपातळीवर एका छताखाली आवश्यक शासकीय सेवा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्रामपंचायत इमारती व ‘सीएससी रूम’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचायतींच्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील हळगाव, साकत, अरणगाव तर कर्जत तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला २५ लाख रूपये निधी मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी वीस लाख तर नागरी सुविधा केंद्रासाठी पाच लाख रूपये मिळणार आहेत.

नवीन उभारण्यात येणाऱ्या नागरी सुविधा केंद्रांमुळे नागरिकांना घराजवळच आधार अपडेट, बँकिंग सेवा, उत्पन्न-निवासी दाखले, पेंशन योजना, PM किसान योजना, उज्ज्वला गॅस योजना, इतर केंद्र व राज्यशासकीय सेवा यांचा लाभ मिळू शकणार आहे. ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन सुविधांबरोबरच डिजिटल सेवांचा प्रसार आणि नागरिकांसाठी सोयीसुविधा वाढवण्यासाठी योजनेचा फार मोठा फायदा होणार आहे. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात कर्जत जामखेड मतदारसंघातील गावांमध्ये ‘स्मार्ट ग्रामपंचायती’ साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

*चौकटीसाठी*

कर्जत-जामखेडच्या ग्रामीण भागात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सरकारकडे माझा नेहमी पाठपुरावा सुरु असतो. केंद्र सरकारच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून निधी मिळावा यासाठी माझा पाठपुरावा सुरु होता. सरकारने त्याची दखल घेतली आणि माझ्या मतदारसंघातील ६ ग्रामपंचायतींसाठी दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे. सदरचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच केंद्र व राज्य सरकारचे मनापासून आभार !

प्रा राम शिंदे, सभापती
महाराष्ट्र विधानपरिषद

चौकट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघात विकास निधी खेचून आणण्याचा धडाका लावला आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या हळगाव, साकत, अरणगाव, भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी या सहा ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी प्रा राम शिंदे यांनी प्रत्येकी २५ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करताच या भागातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here