जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे विद्युत तारेला चिकटून बाप-लेकाचा मृत्यू.

विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे घडली दुर्दैवी घटना

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना चिकटून जाग्यावरच मृत्यू झाला. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांन कडुन बोलले जात आहे.

याबाबत समजकेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे वय 42 व त्यांचा मुलगा महेश काकासाहेब शिकारे वय 15 वर्षे हे दोघे बाप-लेक उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. मात्र मागिल पंधरा दिवसांपुर्वी खर्डा परीसरात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन अनेक विजेचे पोल पडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा खाली पडल्या होत्या.

बाळगव्हाण येथील घटना घडलेल्या शेतात देखील विजेच्या तारांचे पोल खाली पडल्या मुळे या विजेच्या तारा उसाच्या शेतात पडल्या होत्या. मात्र याठिकाणी प्रथम मुलगा खत टाकण्यासाठी गेला तेंव्हा त्याला खाली पडलेल्या तारा न दिसल्याने या तारांना चिकटून त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे वडील काकासाहेब शिकारे हे पाठीमागून शेतात आले व मुलाला चिकटलेले पाहुन ते देखील त्याला वाचवण्यासाठी गेले मात्र त्यांनाही या विजेच्या तारांचा करंट बसुन मृत्यू झाला. ही घटना दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.

मात्र रात्री उशिरा वडील आणि मुलगा शेतातून घरी आले नसल्याने रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ हे शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले. यावेळी त्यांना वडील व मुलाचा विद्युत तारांना चिकटून मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कारवाई करून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेहावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

चौकट

पंधरा ते वीस दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने वीज मंडळाच्या खांबावरील ताबा तुटल्या होत्या, याबाबत येथील नागरिकांनी वीज प्रवाह तुटला असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी तारा जोडून वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे, असे शिकारे वस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे या बाप लेकाचा बळी गेल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. तरी संबंधित विद्युत महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here