
संतोष देशमुखांच्या लेकीची कमालच; वडिलांच्या मृत्यूनंरही मिळवले बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश
जामखेड येथे दिले होते बारावीचे पेपर
जामखेड प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून दाखवले आहे. तीने जामखेड येथे इयत्ता 12 वीचे पेपर दिले होते.

बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.

संतोष देशमुख यांच्या कन्येने त्यांच्या हत्येच्या दोन महिन्यानंतर डोक्यावर दु:खाचा डोंगर असताना 12 बारावीची परीक्षा दिली होती. आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं तिने म्हटले होते. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती. या निकालानंतर वैभवी देशमुख हीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




