मागील आठवड्यात जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीमुळे गाडी डिव्हायडरवर धडकून गाडीने पेट घेतल्याने महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल यांचा मृत्यू झाला होता. ठेकेदाराच्या चुकीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आलेले आहे. सदर ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा लवकरच मी माझ्या कुटुंबीयांसह उपोषण करणार असल्याचा इशारा मयत महादेव काळे यांच्या पत्नी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जामखेड कडे मारुती सुझुकी ईरटिगा वाहन एम एच १६- डिएम-५८९३ या चार चाकी वाहनामध्ये येत असताना कॉन्ट्रॅक्टरच्या चुकी मुळे अपघात होवुन माझे पती व त्यांचे बरोबर असणारे पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल मेजर यांचा मृत्यु झालेला आहे. सदरचा अपघात हा कावेरी हॉटेल, बीड रोड जवळ अर्धवट व चुकीच्या ठिकाणी बांधकाम केलेल्या डिव्हाईडरला धडकुन सदरचा भीषण अपघात झालेला आहे. सदरचा अपघात इतका भीषण होता की, सदरचे वाहन जळुन त्यामधील माझे पती व त्यांचा जोडीदार हे पूर्ण जिवंत जळुन त्यांचा कोळसा झालेला आहे.
सदरचा अपघात हा केवळ सदरचे अर्धवट बांधकाम केलेल्या डिव्हाईडर जवळ कुठेही बॅरीगेटींग केलेले नव्हते, रेडियम लावलेले नव्हते, सूचना फलक लावलेले नव्हते, तसेच सदरच्या डिव्हाईडरला धडकून अपघात होवु नये म्हणुन आवश्यक त्या गोष्टींची काळजी कॉन्ट्रॅक्टरने घेतलेली नव्हती, त्यामुळे सदरचा अपघात हा फक्त ठेकेदार कंपनीच्या निष्काळजी पणामुळे होवुन माझे पतीचा मृत्यु होवुन माझे पतीवर अवलंबुन असणारे माझी मुलगी कु. रुद्राणी वय -०९ वर्ष, माझा मुलगा ऋग्वेद वय ७ वयस्कर सासु मिना, माझे दिर अतुल असे सर्व कुटुंब उघडयावर पडलेलो आहोत. आमचे घरातील कर्ता माणुस गेलेला आहे. आम्ही अनाथ झालेलो आहोत.
जर या ठेकेदार कंपनीने रोडचे काम करताना पाळावयाचे नियम जर पाळले असते तर हा अपघातच झाला नसता. केवळ या ठेकेदार कंपनीच्या हालगर्जी पणामुळे कामात केलेल्या दिरंगाई मुळे मुदत संपून देखील काम पूर्ण झालेले नाही. केवळ ठेकेदाराच्या चुकी मुळे अनेक लोकांना त्या रस्त्यावर अपघात होवुन प्राण गमवावा लागलेला आहे. अनेक जाणांना अपघातुन अपंगत्व आलेले आहे. त्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठया खड्डया मुळे अनेक गरोदर महिचे रस्त्यावरून प्रवासत करताना गर्भपात झालेले आहेत. बरेच लोकांचे मणके खिळखिळे झालेले आहेत. श्वसनाचे आजार झालेले आहेत. सदरच्या ठेकेदारां विरुध्द बरेच जणांनी यापुर्वी तक्रारी केलेल्या असताना पण प्रशासनाने दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातलेले आहे.
त्यामुळे माझे पतीचा झालेला अपघात धनेश्वर ठेकेदार कंपनीच्या चुकी मुळे झाला असल्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून माझे मयत पतीला व माझे कुटूंबीयांना न्याय मिळवून दयावा ही विनंती. आपण सदरचा गुन्हा दाखल न केलेस मी माझे लहान मुले व कुटूंबीयांसह जामखेड तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण करणार आहोत.
निवेदनावर मधुमाला महादेव काळे, अतुल काळे, ॲड अरूण जाधव, प्रा. मधुकर राळेभात, ॲड हर्षल डोके, पवन राळेभात, अमित जाधव, अशोक पोटफोडे, राजू शिंदे, बापू ओव्हळ, सागर घोडके, संतोष मगर, सुनील साळवे, अनिल जावळे, राजेंद्र राऊत, सचिन हारणे यांच्या सह अनेकांच्या निवेदनावर सह्या आहेत.