अरे.. हिच्यासोबत तर माझंपण लग्न झालतं!: पाहुण्याच्या खुलाशाने फसवणूक उघड; नवरी सहकाऱ्यांसह पळली
श्रीगोंदा प्रतिनिधी
लग्नानंतर सोळाव्याच्या कार्यक्रमाला आलेल्या एका पाहुण्याने नवरीला पाहिल्यानंतर ‘माझंपण हिच्यासोबतच लग्न झालतं’ असे सांगितल्याने एकच खळबळ उडाली. त्यातून लग्नाच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आपले भांडं फुटल्याचे लक्षात येताच नवरीने आपल्या सहकाऱ्यांसह तिथून पळ काढला.
मुलामुलींच्या संख्येतील विषम प्रमाणामुळे अनेक मुलांच्या लग्नाचा प्रश्नबिकट बनलाय, नेमक्या या अडचणीचा फायदा काही जण उठवत असल्याच्या अलीकडे अनेक घटना घडत आहेत. काहींचा तर लग्नाची मुले शोधून त्या कुटुंबास गंडा घालवण्यांचा व्यवसाय बनला आहे. मुलांचे लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पालकांची अनेकदा मोठी फसवणूक देखील होते. असेच एक प्रकरण श्रीगोंदा तालुक्यात समोर आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील पूर्वेकडील एका गावातील तरुणाचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे एका मध्यस्थीच्या मदतीने २ लाख ६० रुपये देण्याचे ठरवून लग्न जमविण्यात आले. ४० हजारांची रक्कम देऊन साखरपुडा झाला. उर्वरित रक्कम देऊन नोव्हेंबर महिन्यात लग्नही लावण्यात आले.
लग्न झाल्यानंतर सोळाव्याच्या कार्यक्रमाला पाहुण्याने निमंत्रण देण्यात आले. यावेळी आलेल्या एका पाहुण्यांनी नवरीला पाहिले आणि ‘माझंपण हिच्यासोबतच लग्न झालतं’ असे सांगितले. पाहुण्यांचे बोलणे ऐकून कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. त्यावेळी पाहुण्यांनी अधिक खुलासा करीत सांगितले की, २०२३ मध्ये याच मुलीसोबत माझे लग्न झाले होते. त्यांना दोन लाख रुपये दिले व नंतर ती पळून गेली. त्याच मुलीचे लग्न आता तुमच्या मुलासोबत लावले आहे.
दरम्यान, दोन नातेवाईकांमध्ये चाललेले संभाषण नववधू ऐकत होती. आपले भांडे फुटल्याचे लक्षात येताच ती सहकाऱ्यासह तिथून पळून गेली. फसवणूक झालेल्या कुटुंबाने मध्यस्थाशी वेळोवेळी संपर्क करूनही त्याने रक्कम माघारी देण्यास नकार दिल्याने त्या कुटुंबाने आता श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.










