

बीड-अहिल्यानगर महामार्गावर काळजाचा थरकाप: हायवाच्या धडकेनंतर कारने पेट घेतला; माय-लेकाचा होरपळून अंत
आष्टी प्रतिनिधी
बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर कापशी गावाजवळ एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. खडीने भरलेल्या भरधाव हायवाने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारने तत्काळ पेट घेतला. कारचे दरवाजे लॉक झाल्याने बाहेर पडता न आल्यामुळे कारमधील माय-लेकाचा आतच होरपळून जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील रहिवासी असलेले माय-लेक आपल्या कारमधून बीडच्या दिशेने जात होते. याच वेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवाने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडकेमुळे कारच्या इंजिनने क्षणात पेट घेतला. अपघात इतका भीषण होता की कारचा दरवाजा चेंदामेंदा झाला होता, त्यामुळे आत अडकलेल्या दोघांना बाहेर पडता आले नाही. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि मदतीसाठी कोणी पुढे येण्यापूर्वीच दोघांचाही करुण अंत झाला. या अपघातात मृत्यू झालेले माय-लेक आष्टी येथे स्थायिक होते. ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २७) आणि आई पुष्पा श्रीहरी पुरी (वय ४८)।असे मृत्यू झालेल्या माय लेकराचे नाव आहे. मयत ऋषिकेशचे वडील श्रीहरी पुरी हे परिसरात सुप्रसिद्ध कीर्तनकार असून ते ग्रामसेवक म्हणूनही कार्यरत आहेत. मुळचे केज तालुक्यातील असलेले हे कुटुंब सध्या आष्टी शहरातील मुर्षदपूर येथे वास्तव्यास होते.

अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी व पोलीसांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली, मृतदेह कारमध्ये अडकलेले असल्याने ते बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल दीड ते दोन तास शर्थीची प्रयत्न करावे लागले. मात्र तोपर्यंत गाडीचा सांगाडा झाला होता. दरम्यान महामार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.


वडील कीर्तनात असतानाच मुलगा व पत्नीवर काळाचा घाला.
श्रीहरीपुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरतअसून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी पुरी महाराज एका कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. वडील कीर्तनात असतानाच मुलगा व पत्नीवर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.








