Home क्राईम न्यूज खर्डा येथे भीषण अपघात: दुचाकी आणि बोलेरोच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक...

खर्डा येथे भीषण अपघात: दुचाकी आणि बोलेरोच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

खर्डा येथे भीषण अपघात: दुचाकी आणि बोलेरोच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

जामखेड प्रतिनिधी

खर्डा-जामखेड रस्त्यावरील बळीराजा हॉटेलजवळ आज (दि. 28 मार्च) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी आणि बोलेरो जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात खर्डा येथील तरुण व्यावसायिक साहिल सलीम बागवान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांचे चुलत भाऊ मोहसीन हनीफ बागवान हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साहिल सलीम बागवान आणि मोहसीन हनीफ बागवान हे दोघे चुलत भाऊ आज सकाळी 8.30 वाजता त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. MH-16-CU-8287) खर्डा येथून जामखेडकडे बाजारासाठी निघाले होते.ते बळीराजा हॉटेलजवळ जात असताना, जामखेडहून येणारी बोलेरो जीप (क्र.MH-16-DM-6058) अचानक हॉटेलकडे वळली. यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीची बोलेरोला जोराची धडक बसली. या भीषण धडकेत साहिल बागवान हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. तर,मोहसीन बागवान यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी अपघातग्रस्त बोलेरो गाडी ताब्यात घेतली असून, संशयित आरोपी चालक गोकुळ दराडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खर्डा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ. संभाजी शेंडे हे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

खर्डा परिसरात शोककळा

साहिल आणि मोहसीन हे दोघेही बटाट्याचे होलसेल आणि रिटेल व्यापारी होते. अगदी कमी वयात या तरुणांनी उद्योग-व्यवसायात मोठी भरारी घेतली होती. त्यांच्या या प्रगतीचे परिसरात कौतुक होत असतानाच, साहिल बागवान यांच्या अकाली मृत्यूची बातमी आल्याने खर्डा व पंचक्रोशीत मोठी शोककळा पसरली आहे, अनेकांनी यावेळी हळहळ व्यक्त केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!