सामाजिक एकतेसाठी ‘ संत विचारांची शिदोरी ” घेऊन निघणाऱ्या चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची चे जामखेड येथे आगमन
जामखेड प्रतिनिधी
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘चोखोबा ते तुकोबा’ या समता वारीचे प्रतीवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रारंभ बुधवार, दि. १ जानेवारी २०२५ रोजी श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून झाला आहे. भागवत धर्म – वारकरी संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
‌‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२५ ‘चे यंदाचे ७ वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम-पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, जालना, सिंदखेडराजा, मेहुणाराजा , देउळगांवराजा, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे. वारी राज्यातील ९ जिल्ह्यातून १७५० किलोमीटर प्रवास करणार आहे.
संतांनी सांगितलेल्या समता, बंधूता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे. संत चोखोबांची उत्सवमूर्ती ही विशेष सजविलेल्या गाडीत विराजमान असणार आहे . शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्ती, गाव, शहर या ठिकाणी जाऊन वारी दरम्यान प्रबोधन करण्यात येणार आहे. माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होऊन समाजात बंधूभाव वाढीस लागावा, समाजातील जातीय-धार्मिक विद्वेषी दरी कमी होऊन आपापसात बंधूभाव वाढावा यासाठी तसेच समता, मानवता व बंधूभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यत पोहचवण्यासाठी समता वारीचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते, एकसंघ समाज हे राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे. जात, पंथ, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्वजण भारतीय एक आहोत हा विचार घेऊन सामाजिक एकतेसाठी चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची चे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले आहे.

समता वारीचे आज रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वा‌.जामखेड येथे आगमन झाले. वारी रथाचे संविधान चौक जामखेड येथे कृ.उ.बा.स. संचालक सागर सदाफुले, ह.भ.प. राजेंद्र म्हेत्रे महाराज, आदर्श शिक्षक साहित्यिक गोकुळ गायकवाड, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, सतीश सदाफुले सर, बौद्ध महासभेच्या जिल्हा सचिव सुरेखाताई अ. सदाफुले, शहर अध्यक्षा सुरेखा र.सदाफुले, वैशाली प्रमोद सदाफुले, ज्ञानदेव सदाफुले, अनिल सदाफुले, सचिन सदाफुले, यांनी स्वागत केले संत चोखोबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि वारीचे निमंत्रक श्री सचिन पाटील, महादेव ढेंबरे, मल्हारराव पिंपळे पाटील, शरदराव गायकवाड, लक्ष्मण चिलवंत, ॲड. रोहित मुंडे यांचे ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here