मराठा आंदोलक, सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा जामखेड येथे निषेध
आखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीने दिले तहसीलदार यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जामखेड येथे आखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. सदर घटनेला चार दिवस उलटूनही मुख्य आरोपी आणि राजकिय मुख्य सुत्रधार अजूनही मोकाट आहेत. या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी जामखेड तालुक्यातील मराठा बांधवांनी निवेदन देता वेळी केली आहे.
मराठा आंदोलक, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि १३ डीसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जामखेड तहसीलदार गणेश माळी यांना अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठा बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय व्देषातून मराठा समाजावर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. त्यातूनच मस्साजोग, ता. केज, जि.बीड येथील उमदं व्यक्तिमत्व मराठा आंदोलक तथा तरूण संरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. सदर घटनेला चार दिवस उलटूनही मुख्य आरोपी आणि राजकिय मुख्य सुत्रधार अजूनही मोकाट आहेत.
सदर गुन्ह्यात आरोपी व सह आरोपी म्हणून ज्यांची नावे फिर्यादी यांनी दिली आहेत, त्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. आरोपींना राजकीय वरद हस्त देणार्‍यांना व केजच्या पोलिस निरिक्षक व उपनिरिक्षक यांना निलंबित करून सह आरोपी करण्यात यावे. सदर केस विशेष सरकारी वकील नेमून, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार रविराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देऊन कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे.
याबाबत प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन त्याची पुर्तता करावी. अन्यथा अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याचे वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी बोलताना मराठा बांधवांनी दिला आहे. तहसील गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन आपल्या सर्व मागण्या वरीष्ठ पातळीवर कळवण्यात येतील असे सांगण्यात आले. यावेळी तालुक्यातील आखंड मराठा समाज जामखेड तालुका बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here