बाप्पाच्या आगमानाला लेसर लाइटमुळे तरुणाच्या डोळ्यातून झाला रक्तस्राव; या जिल्ह्य़ात घडली घटना
कोल्हापूर : घरोघरी आणि गणेश मंडळात शनिवारी बाप्पाचं आगमन झालं. वाजत-गाजत, ढोल ताशाच्या गजरात, डिजेच्या दणदणाटात गणरायाची मिरवणूक काढून महाराष्ट्रासह देशभरात गणपती बाप्पा विराजमान झाले. दरम्यान, बाप्पाच्या मिरवणुकीत लेसर लाइटच्या वापरामुळे कोल्हापुरात तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. लेसर किरणे थेट डोळ्यावर पडल्यानं रक्तस्राव झाला. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार केले गेले.
दरम्यान, शुक्रवारी गणेश मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभा राहिलेल्या एका पोलिसाच्या डोळ्यालाही या लेसर किरणांमुळे इजा झाली. संबंधित कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उचगाव येथे गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर विद्युतझोत वापरण्यात आला होता. या विद्युतझोताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने या तरुणाचा डोळा लाल झाला. त्यातून पाणी वाहू लागल्यानंतर त्याला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात आणले असता त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा होऊन आत रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणवू लागला होता. त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले.
पुण्यात लेसरवर बंदी
पुणे शहर पोलिसांनी यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट वापरण्यास बंदी घातली आहे. कारण गेल्या वर्षी यामुळे काही जणांच्या डोळ्यांना इजा झाली होती. यासह या लेसर लाईटमुळे डोळ्यांचे गंभीर आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.