आमदार प्रा.राम शिंदे यांनी मंजुर केलेल्या मलनिस्सारण (भूयारी गटार) योजनेचे श्रेय घेण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न – पवनराजे राळेभात
जामखेड प्रतिनिधी
आमदार प्राराम शिंदे यांनी मंजुर करून आणलेल्या जामखेड शहर भूयारी गटार (मलनिस्सारण) योजनेचे आमदार रोहित पवार यांनी भूमिपूजन केल्या नंतर भाजपकडून चांगलाच समाचार घेतला आहे. 77.53 कोटी रूपये खर्चाच्या मलनिस्सारण योजनेचे श्रेय आ. रोहित पवारांनी घेतल्या वरून जामखेड शहर भाजप आक्रमक झाली आहे. भाजप शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी मलनिस्सारण योजनेवरून आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
विकासाचा पोकळ दावा करणाऱ्या रोहित पवारांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर जामखेड शहर मलनिस्सारण (भूयारी गटार योजना) योजनेचे श्रेय लाटण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला. वास्तविक पाहता ही योजना आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मंजुर झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 डिसेंबर 2022 रोजी मलनिस्सारण योजनेला मंजुरी दिलेली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून महायुती सरकारने मंजुर केलेल्या या कामाचे श्रेय घेऊन जनतेला फसवण्याचे उद्योग रोहित पवारांकडून सुरू आहेत. त्यांच्या या भूलवा भूलवीला शहरातील सुजाण जनता कदापी थारा देणार नाही, आमच्या नेत्याने मंजुर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, अशी जोरदार टीका भाजपचे जामखेड शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी केली.
आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी जामखेडमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा घेतला. त्यात त्यांनी 77.53 कोटी रूपये खर्चाच्या मलनिस्सारण योजनेचे भूमिपूजन केले.सदर योजनेचे श्रेय रोहित पवारांनी घेतल्यावरून शहर भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी मंजुर केलेल्या योजनेचे श्रेय घेतल्यावरून शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी आमदार पवारांविरोधात जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
यावेळी बोलताना राळेभात म्हणाले की, आमचे नेते आमदार प्रा राम शिंदे यांनी 1 डिसेंबर 2022 रोजी जामखेड शहर भाजपच्या 100 पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची वर्षा निवासस्थानी भेट घेत जामखेड पाणी योजना व मलनिस्सारण (भूयारी गटार योजना) प्रकल्प मंजुर करावा अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या समक्ष दोन्ही योजना मंजुर करत असल्याची घोषणा केली होती व त्याच दिवशी दोन्ही योजनांच्या मंजुरीचा शासन निर्णय जारी केला होता.
1 डिसेंबर 2022 रोजी जामखेड शहरातील मलनिस्सारण प्रकल्पासाठी महायुती सरकारने 69.16 कोटींचा निधीस प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर सरकारने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभाग यांच्या 26 डिसेंबर 2023 च्या पत्रान्वये सुधारित तांत्रिक मान्यता देत 77.53 कोटींचा निधी मंजुर केला होता. ही सर्व प्रक्रिया पार पडत असताना आमदार प्रा राम.शिंदे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. आमदार प्रा राम शिंदे यांच्यामुळेच जामखेड शहरासाठी आवश्यक असलेला कोट्यावधी रूपये खर्चाचा मलनिस्सारण प्रकल्प मंजुर झाला आहे. विरोधकांनी आमच्या नेत्याने मंजुर केलेल्या कामावर डल्ला मारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशी खरमरीत टीका यावेळी राळेभात यांनी केली.
चौकट
आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून महायुती सरकारने मंजुर केलेल्या मलनिस्सारण (भूयारी गटार योजना) योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या कोनशिलेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून सदर योजना मंजुर असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. याचा अर्थ सत्तेत नसताना जर तुमचे इतके कामे होत असतील तर तुम्ही सभागृहाबाहेर राहून समाजसेवा करावी. त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मलनिस्सारण योजना मंजुर करता आली नाही. पण महायुती सरकारने मंजुर केलेल्या योजनेचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न रोहित पवारांनी केला आहे. यामाध्यंमातून जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न जामखेडची जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here