पद्मश्री पोपटराव पवार व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान.
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने स्व.आमदार राजीव राजळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम रविवार दि ७ जुलै रोजी अहमदनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कथा, कविता, कादंबरी, संकीर्ण तसेच साहित्य साधना जीवन गौरव इ. विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे पद्मश्री पोपटराव पवार व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या सह अनेक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यात जामखेड येथील शिक्षक मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ या साहित्यकृतीला सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा राज्य पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हजारो वर्षांचा मानवी उत्कर्षाचा इतिहास पाहता विश्वातील नद्या, डोंगर, चंद्रसूर्य, फुले आदि निसर्गाची शेकडो सौंदर्यस्थळे असली, तरी त्याला देशकाळाच्या मर्यादा असतात; परंतु दर्जेदार साहित्यकृतीतील शब्दसौंदर्य हे लक्षावधी रसिकांच्या भावविश्वावर चिरंतन अधिराज्य गाजवते. साहित्याचा मानवी जीवनाच्या जडणघडणीवर विलक्षण प्रभाव पडतो. म्हणूनच समाजाचे उत्थान करायचे की समाजात उत्पात घडवायचा याचे भान आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात साहित्यिकांनी ठेवणे नितांत गरजेचे आहे.
साहित्य हे समाजमनाचे प्रतिबिंब असून साहित्यिकांनी पर्यावरण रक्षण, ग्रामोन्नती, व्यक्तिमत्त्व विकास आदि सकारात्मक विचारांची मांडणी असलेल्या प्रेरणादायी साहित्याची निर्मिती करून देशसेवेचे व्रत अंगिकारावे असे मत हिवरे बाजार या आदर्श गावाचे क्रांतीपुरूष तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार मोनिका राजळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार संग्राम जगताप, मसापचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड आदि मान्यवर उपस्थित होते.
मसाप अहमदनगरचे अध्यक्ष किशोर मरकड, राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पालवे, डाॅ.श्याम शिंदे, प्रा.मेधाताई काळे, नसीर शेख, शिवाजी साबळे, ज्ञानदेव पांडुळे, राजेंद्र चोभे, अरविंद ब्राह्मणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रा.डॉ.चं.वि.जोशी, सूत्रसंचालन शीतल म्हस्के, प्रा.देवढे व शिल्पा रसाळ यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष दशरथ खोसे यांनी केले आणि शाहीर भारत गाडेकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट
मनोहर इनामदार हे जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते कवी, लेखक, कीर्तनकार म्हणून राज्यात सुपरिचित असून ‘संत चरित्रकार महिपती’ या चित्रपटाचे गीतकार आहेत. विविध भक्तिगीतांच्या अल्बममध्ये त्यांनी लिहिलेली गिते सुरेश वाडकर, कला पाटील, अतुल दिवे, माधुरी करमरकर, संतोष कुलट अशा दिग्गज गायकांनी गायिली आहेत. त्यांचे ‘आम्ही स्वच्छतादूत’, ‘बिल्वदल’, ‘प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा’ व ‘गवसणी’ या साहित्यकृती प्रकाशित असून केंद्र शासनाच्या संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत मिसाईल मॅन तथा माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत २००७ मध्ये दिल्ली येथे झालेल्या व भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २००८ मध्ये पुणे येथे झालेल्या निर्मल ग्राम पुरस्कार वितरण समारंभात ते निमंत्रित मान्यवर म्हणून उपस्थित होते.