जातेगावच्या ग्रामसेवकास ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले;

जन्म-मृत्यू नोंदवहीतील माहिती देण्यासाठी मागितली होती १० हजारांची लाच.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास जन्म-मृत्यू नोंदवहीतील माहिती देण्यासाठी लाचेची मागणी करून त्यातील ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. महादेव मल्हारी ढाकणे (वय ५३), ग्रामसेवक, ग्रामपंचायत जातेगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी जामखेड येथील खर्डा रोडवरील हॉटेल महाभागवती येथे करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुरुष, वय ५१ वर्षे व्यवसाय शेती. या तक्रारदार यांनी दि. ११ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत जातेगाव येथील ग्रामसेवक महादेव ढाकणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. यावेळी तक्रारदार यांनी सरपंच, ग्रामपंचायत बोरखेडे, ता. जि. बीड यांच्या नावाची सन १९८८ मधील ग्रामपंचायत जातेगावच्या जन्म-मृत्यू नोंदवहीत नोंद आहे किंवा नाही, तसेच त्यासंदर्भातील इतर माहिती मिळण्या बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली होती. सदर माहिती देण्यासाठी ग्रामसेवक ढाकणे यांनी तक्रारदाराकडे “तुम्हाला जेवढे पैसे देता येतील तेवढे पैसे द्या,” असे सांगून लाचेची मागणी केली होती. तसेच समक्ष माहितीचा अर्ज देण्यास सांगण्यात आले होते.

मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्याकडे दूरध्वनीद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये जातेगाव येथिल ग्रामसेवक महादेव मल्हारी ढाकणे यांनी १० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
याच अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. ११ ऑगस्ट रोजी जामखेड येथील खर्डा रोडवर असलेल्या हॉटेल महाभागवती येथिल चहाच्या हॉटेलमध्ये लाच मागणी पडताळणीची कारवाई केली. यावेळी पंचांसमक्ष ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे यांनी अर्जातील माहिती देण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याचवेळी तक्रारदाराने संबंधित माहितीचा अर्ज ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे दिला असून, त्या अर्जावर पोहोचही घेण्यात आली होती.

या कारवाईदरम्यान ग्रामसेवक महादेव ढाकणे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. तसेच तक्रारदाराकडे उर्वरित ५ हजार रुपये नसल्याने त्यांनी उर्वरित रक्कम फोन-पे द्वारे देण्याचे सांगितले. याच दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या परीसरात सापळा लावला होता. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेबाबतची पुढील कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाईचे नेतृत्व सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांनी केले. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून अजित त्रिपुटे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांनी काम पाहिले. तसेच सापळा पथकात पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर वाघ आणि चालक पोलीस हवालदार कारंडे यांचा समावेश होता.

या कारवाईस श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक; श्री. प्रदीप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक; तसेच श्रीमती कविता फडतरे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here