


अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
जामखेड शहरासह तालुक्यात अवैध दारू वाहतूक व विक्री करणारांचे धाबे दणाणले
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून तालुक्यात इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अवैध देशी विदेशी दारू होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. यानुसार खर्डा रोडवरील मारूती मंदिराजवळ सापळा लावून आरोपीकडुन 8 लाख 12 हजार 600 रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अहिल्यानगरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, सुनिल मालणकर, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने अवैध धंदे करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक 14 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत एक इसम त्याचेकडील बोलेरो गाडी क्रमांक एम.एच.16.डी.एम. 9244 यामधुन देशी व विदेशी दारुचे बॉक्स विक्री करणे कामी वाहतुक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

पथकाने तात्काळ जामखेड शहरात मारुती मंदिरा जवळ खर्डा रोडवर जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील नमुद वाहन येतांना दिसले. तेव्हा पथकाने सदर वाहन थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव शरद बाबासाहेब शिकारे वय-37 वर्षे रा. शिकारेवस्ती, बाळगव्हाण ता. जामखेड जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील इसमांचे कब्जातुन 63,000/- रु किमतीचे देशी विदेशी दारु, 7,50,000/-रु किमतीची बोलेरो चारचाकी वाहन असा एकुण 8,13,600/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ताब्यातील आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 297/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(अ),(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.







