

भुतवड्यात मध्यरात्री घरात घुसून चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेसह मुलाला मारहाण, ६५ हजारांचा ऐवज लंपास
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील भुतवडा (तलाववस्ती) येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी घरात घुसून आई-मुलाला मारहाण करत महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतर चोरट्यांनी महीलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, घरातील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी सुरेश जालिंदर डोके (वय ३३, व्यवसाय ड्रायव्हर, रा. भुतवडा, तलाववस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अनुषंगाने एकुण चार अज्ञात चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता सुरेश डोके हे भुतवडा, ता. जामखेड येथून गाडी भाड्याने घेऊन गेले होते. त्यानंतर दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १.३० वाजता ते भुतवडा (तलाववस्ती) येथील आपल्या घरी आले. रात्री सुमारे २ वाजता घरातील लाईट सुरू करून घराचा दरवाजा थोडा उघडा ठेवून जेवण करत असताना अचानक घरात चार अनोळखी २५ ते ३० वर्षे वयाचे चोरटे घुसले. या चारही चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधलेले होते. यातील एका चोरट्याने चॉकलेटी रंगाचा शर्ट, दुसऱ्याने हिरव्या रंगाचा शर्ट, तिसऱ्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट त्यावर पट्टे असलेला, तर चौथ्या इसमाने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता.

घरात घुसल्यानंतर या अनोळखी चोरट्यांनी सुरेश डोके तसेच त्यांची आई केशरबाई यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली. तसेच केशरबाई यांच्या गळ्यातील अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. तसेच चोरट्यांनी घरातील पेटीत ठेवलेली २० हजार रुपये रोख रक्कम तसेच सुरेश डोके यांचा एक मोबाईल फोन, अंदाजे किंमत ५ हजार रुपये, असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
या मारहाणीत सुरेश डोके व त्यांच्या आई केशरबाई जखमी झाल्यानंतर उपचारासाठी प्रथम जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर केशरबाई यांना जास्त मारहाण झाली असल्याने यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री गावातील बाबासाहेब भगवान डोके, अजिनाथ श्रीधर डोके आणि अशोक आण्णा डोके यांच्या घरी देखील चोरी झाल्याचे आपल्याला समजले असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. आपल्या घरात घुसून चोरी करणाऱ्या अनोळखी इसमांना पाहिल्यास आपण त्यांना ओळखू शकतो, असेही फिर्यादी यांनी सांगितले आहे. या घटनेप्रकरणी सुरेश जालिंदर डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलीस स्टेशनला एकुण चार अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अघाव हे करित आहेत.









