‘दत्तवाडी पॅटर्न’चा शिक्षण संचालकांनी केला गौरव

रोखठोक जामखेड

तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे उपाध्यापक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक मनोहर इनामदार यांचा शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात सन 2019-20मध्ये वर्षभर तालुक्यातील अनेक शाळांतील इ.5 वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक रविवारी तसेच दिवाळीच्या सुट्टीत सातत्याने केलेल्याने मोफत मार्गदर्शनाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अहमदनगर येथे अॅक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र (ATM) संचलित कृतिशील शिक्षक महाराष्ट्र परिवाराने शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील विविध शिक्षकांच्या गौरवार्थ ‘ए.टी.एम.रत्न’ सन्मान सोहळ्याचे नुकतेच आयोजन केले होते.
महाराष्ट्र शासनाच्या ‘जीवन शिक्षण’ मासिकातील जानेवारी 2021 च्या अंकात श्री.इनामदार यांचा ‘शिष्यवृत्तीचा दत्तवाडी पॅटर्न’ हा लेख प्रकाशित झाला असून शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल 100% लागल्याबद्दल जि.प.अहमदनगरच्या शिक्षण समिती सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथ. कार्यालयाकडून त्यांना पत्र पाठवून विशेष अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन उपसंचालक रमाकांत काठमोरे ,नवनियुक्त शिक्षणाधिकारी अरूण धामणे, डाएट संगमनेरचे प्राचार्य डी डी.सूर्यवंशी,रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय उपनिरीक्षक काकासाहेब वाळुंजकर, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त नारायण मंगलाराम ,राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके होते.
राज्यातील उच्चपदस्थ मान्यवरांकडून झालेल्या गौरवामुळे श्री.इनामदार यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here