जामखेड प्रतिनिधी
भौगोलिकदृष्ट्या मोठी हद्द असलेल्या कर्जत- जामखेड मतदारसंघाच्या दोन्ही तालुक्यांच्या पोलीस ठाण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते,आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने अत्याधुनिक २ टाटा योद्धा जीप व ४ बजाज मोटार सायकल वाहने देण्यात आली.
या वाहनांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुंबई मंत्रालय येथे लोकार्पण करण्यात आले.मतदारसंघातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी,सर्व ठिकाणी गस्त घालण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेला सक्षम करण्यासाठी ही वाहने महत्वपूर्ण भुमिका बजावणार आहेत. मतदारसंघातील दोन्ही तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालयांची संख्या जास्त असुन त्यामध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे.बीड उस्मानाबाद, सोलापुर या जिल्ह्यांच्या सिमारेषा लगतच असल्याने या भागात गुन्हे घडवून पोलिसांना आव्हान दिले जाते. मात्र गस्तीसाठी नवीन वाहने उपलब्ध झाल्याने गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. मतदारसंघातील महिला व मुलींच्या बाबतीत घडणार्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरता निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. नागपुरच्या धर्तीवर मतदारसंघात आता ‘भरोसा सेल’ स्थापन करण्यात आले असुन या सेलच्या माध्यमातुन कर्जत व जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकुण १०० ठिकाणे हॉट-स्पॉट म्हणून निवडण्यात आली आहेत. यामध्ये शाळा महाविद्यालये, मंदिरे, बगीचे, प्रेक्षणीय स्थळे तसेच महिलांची गर्दी होणाऱ्या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी आर. एफ. आयडी मार्फत नियंत्रण करण्यात येणार असुन मोबाईल स्कॅनद्वारे येथील गस्त पथकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयांच्या ठिकाणी तक्रारपेटी बसविण्यात येणार असुन तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. छेडछाड तसेच त्रास देणाऱ्याविरुद्ध गोपनीयरित्या व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असुन शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. ‘भरोसा सेल’ व ‘निर्भया पथक’ यांच्या मदतीने पिडितांना न्याय देता येणार आहे. पोलीस पाटील, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचीही या भरोसा व निर्भया पथका करता मदत होणार आहे.
आ. रोहित पवार बोलताना म्हणाले,’जिल्हा पोलिस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत-जामखेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तरुण, अनुभवी व उत्साही असल्यामुळे या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून येथील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवून कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यात मदत होईल. पुढील काळामध्ये जिल्हा अधिक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणारी ‘ई-टपाल’ योजना कार्यान्वित करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. विविध कामाची माहिती ऑनलाइन मिळणार असून कोणताही अर्ज अत्यंत कमी कालावधीत निकाली काढण्यास व कामकाजाचा निपटारा होण्यासाठी सहकार्य होणार असल्याचे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
या लोकार्पणासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक जगन्नाथ, अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उप विभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते.
______________________________
राज्यातील इतर आमदारांनी असा उपक्रम राबवावा- गृहमंत्री अनिल देशमुख
कर्जत-जामखेडच्या पोलीस दलासाठी मिळालेल्या वाहनांमुळे दोन्ही तालुक्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होईल.गुन्हेगारी रोखण्यास व माता-भगिनींना दिलासा देण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरतील.आ.रोहित पवारांनी राबवलेला उपक्रम नाविन्यपूर्ण आहे.राज्यातील इतर आमदारांनीही असा उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस दलाच्या बळकटीकरणात पुढाकार घ्यावा.