करमाळा प्रतिनिधी (अलीम शेख)
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात उस तोडणी मजूराच्या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी शार्पशूटरही दाखल झाले आहेत. बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने आदेश दिले होते. त्यानंतर त्या ठिकाणी शार्पशूटर दाखल झाले आहेत. परंतु, शार्पशूटर गावात दाखल होण्यापूर्वीच बिबट्यानं आठ वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे.
फुलाबाई अरचंद कोटली, रा. दुसाने. तालुका साक्री, जिल्हा नंदुरबार वय वर्षे ९ आसे या मृत मुलीचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्य़ातील दुसाने येथील हे कुटुंब करमाळा येथील चिखलठान येथे उसतोडणी साठी आले होते. या ऊस तोडणी कामगार कुटुंबातील मुलीचा नरभक्षक बिबट्याने आज दि ७ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हल्ला करून ठार केले. ही घटना करमाळा तालुक्यातील चिखलठान येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात घडली त्यांच्या शेतात आज काही उसतोड कामगार ऊस तोडणी चे काम करीत होते. बाजूलाच ऊस तोडणी कामगारांची मुले खेळत होती अशातच नरभक्षक बिबट्याने त्या निष्पाप मुलीवर हल्ला केला. घटनेची माहिती उसतोडणी मजुरांना समजताच या ऊस तोडणी कामगारांनी त्या बिबट्याचा पाठलाग केला व त्याला हुसकावून लावुन मुलीस बिबट्याच्या तावडीतून सोडवले मात्र तो पर्यंत मुलगी गंभीर जखमी झाली होती. तीला तातडीने करमाळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.
वनविभाग खाते आणखीन किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार ,वनविभागाने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेशाचे त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की बिबट्याच्या हल्ल्यात आज चिकलठाण येथील तिसरा बळी असून सदरची घटना खरोखरच मन हेलावून टाकणारी आहे याबाबत आम्ही राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना भ्रमणध्वनीद्वारे करमाळा तालुक्यात मोकाट फिरणाऱ्या व निष्पाप शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वेळीच ठार मारावे अशी मागणी केली होती त्या आमच्या मागण्या ला आज यश आले असून मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी त्वरित बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही वनविभाग कडून कोणतीही हालचाल झालेली दिसत नसून वन विभागाने त्वरित मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या आदेशाचे पालन करून नरभक्षक बिबट्याला ठार मारावे अशी मागणी शेवटी पाटील यांनी केली आहे.