कुणाकडे काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. :- ह. भ. प. प्रतिभा ताई गायकवाड.

जामखेड (प्रतिनिधी) :- आपले जीवन कसे जगायचे, कुणाकडे काय मागायचे आणि कुठे मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. आपली मागणी संसारातील असो किंवा पर्मार्थातील असो ती सर्वश्रेष्ठ असली पाहिजे असा उपदेश किर्तनकार तथा शिव चरित्रकार ह. भ. प. प्रतिभा ताई गायकवाड यांनी केला.

तीर्थ क्षेत्र महादेव मंदिर देवस्थान व ज्ञानेश्वर सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भवरवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनाचे चौथे पुष्प गुंफताना त्या बोलत होते.

हेची देवा पै मागता, चरण सेवा अखंडित l वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरी दासाचा l जन्म घेता कुठल्या याती l नामा म्हणे कमळापती, हे द्यावे पुढता पुढती l हा संत नामदेव महाराजांचा मागणीपर प्रकरणातील ४ चरणाचा अभंग किर्तन सेवेसाठी त्यांनी निवडला होता. या अभंगात संत नामदेवांनी देवाकडे कशाची मागणी केली आहे. त्याचे वर्णन आले आहे. हे देवा तुझ्याकडे मी एकच मागणी करतो, ती म्हणजे तुझी चरण सेवा अखंडितपणे करण्याची संधी मला दे. पंढरपूर मध्ये वास्तव्य असू दे. आणि सतत हरी दासाचा सहवास लाभू दे अशी मागणी त्यांनी या अभंगातून केली आहे.

एकदा का हरिदासाचा सहवास लाभला. की मग कुठल्याही याती मध्ये जन्म घेतला तरीही कशाचीही भीती राहत नाही. पण फक्त देवा आमच्याकडून हरी भक्ती चुकवू देऊ नको, आणि त्यामध्ये खंड पडू देऊ नको, एवढीच माझी मागणी आहे.

संत महात्मे जेव्हा जगाच्या कल्याणासाठी काही मागतात, तेव्हा त्याला पसायदान म्हणतात. जेव्हा काही लोक देवाकडे स्वतःसाठी काही मागतात. त्याला भिक म्हणतात. तर भगवंता कडून घेऊन दुसऱ्याला दिले जाते त्याला दान म्हणतात. संत नामदेव महाराज हे मागणारे तर भगवान पांडुरंग देणारे आहेत. म्हणूनच त्यांनी देवाकडे काय मागितले याचा उल्लेख या अभंगात आला आहे. तुझी चरण सेवा करण्याची संधी पुढच्या जन्मातही मला मिळू दे अशी मागणी त्यांनी या अभंगातून केली आहे. संत नामदेवांच्या अभंगावरील निरूपणा बरोबरच ह. भ. प. प्रतिभाताई गायकवाड यांनी आपल्या पहाडी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि शौर्यगाथा मांडली.

तीर्थ क्षेत्र महादेव मंदिर देवस्थान व ज्ञानेश्वर सेवा संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य ह.भ. प. कांताताई (माईसाहेब) सोनटक्के यांच्याप्रमुख उपस्थितीत झालेल्या या किर्तन सोहळ्यासाठी ह. भ. प. आदिनाथ महाराज तांदळे, पत्रकार उत्तमराव बोडखे, शिवाजीराव बिडवे, हौसराव आजबे, कऱ्हे वडगाव च्या सरपंच वंदना ताई परीवंत यांच्या सह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या किर्तनास गायनाचार्य भैरव गुरुजी चव्हाण, देविदास महाराज जाधव, बाबा रामदासी, योगेश क्षिरसागर, विठ्ठल महाराज जाधव, गणेश महाराज दौंड, रत्ना ताई सुतार, मंथन ताई ठाकर, आरती मते, यांनी साथ संगत केली.

चौकट :- सायंकाळी ५ वा. तीर्थ क्षेत्र महादेव मंदिर ते भवर वाडी येथील हनुमान मंदिर अशी दिंडी प्रदक्षिणा ह.भ. प. कांताताई माई साहेब सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. या दिंडी सोहळ्यात श्रीमद् भगवत गीता, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी असे धार्मिक ग्रंथ, डोक्यावर कलश व तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, वारकरी सांप्रदायाच्या भगव्या पताका, खांद्यावर घेऊन मिरवणारे वारकरी, टाळ मृदंगाच्या निनादात आणि जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात हनुमान मंदीरात पोहचली. भवरवाडी चे ग्राम दैवत हनुमानाचे दर्शन घेऊन ही दिंडी ६ वा. महादेव मंदिरात पोहचली त्यानंतर हरीपाठाचा कार्यक्रम झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here