जामखेड प्रतिनिधी
जिल्हा शिक्षक बँकेतील सत्ताधारी संचालक मंडळाकडून अतोनात भ्रष्टाचार होत असून शिक्षकांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी अहमदनगर जिल्हा शिक्षक बँक आता धोक्यात आली आहे असे सुतोवाच जामखेड शिक्षक बँकेसमोर घंटानाद आंदोलनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष विजय जाधव यांनी केले.
यावेळी गुरुकुल मंडळ अध्यक्ष राम ढवळे, उत्तम पवार, संतोष डमाळे, अशोक घोडेस्वार,सचिन अंदुरे, अभिमान घोडेस्वार, आजिनाथ पालवे, विजय जेधे,
नामदेव खलसे, सुशील पौळ,संतोष वाघ, संतराम शेळके, उपस्थित होते.
शिक्षक बँकेची पाच वर्षे मुदत संपून आज एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला या दरम्यानच्या कालावधी मध्ये संगणक खरेदी, सीसीटीव्ही खरेदी असे गरज नसताना केवळ मनमानी कारभार विद्यमान संचालक मंडळ करताना दिसत आहे त्याला प्रशासन देखील दुजोरा देत आहे. नातलग कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे. पदांची भरती करणे आर्थिक सौदा न जुळल्याने वरीष्ठांना डावलून शिपाई व लिपिक पदाच्या कर्मचार्यांना बढती देणे असे अनेक गैरप्रकार करून बँकेची व अहमदनगर जिल्ह्यातील तमाम शिक्षक सभासदां ची आर्थिक लाभापोटी संचालक मंडळाने शुद्ध फसवणूक केलेली आहे.
बँकेच्या वाढीव मुदतीत जबाबदारी चे निर्णय घेण्याऐवजी सभासद हिताला बाधा पोहचेल असे मनमानी निर्णय घेत सुटले आहेत. बँकेतील कोट्यावधींचा अपहार टाळण्यासाठी विद्यमान संचालकांनी त्वरीत राजीनामे द्यावेत अन्यथा शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाच्या वतीने भव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गुरुकुल मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पवार व जामखेड शिक्षक समिती माजी अध्यक्ष संतोष डमाळे यांनी यावेळी दिला.






