श्री शिवराज्याभिषेक उत्सवाने जामखेड शिवमय; भव्य ऐतिहासिक मिरवणुकीने सांगता

रक्तदान, कीर्तन, पोवाडे, जलाभिषेक आणि ऐतिहासिक देखाव्यांनी जामखेडमध्ये निर्माण केली नवी परंपरा

जामखेड प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात हिंदवी स्वराज्य दिनानिमित्त जामखेड येथे श्री शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने दि. २३ ते २७ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला श्री शिवराज्याभिषेक उत्सव भक्तिमय, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला.

पाच दिवस धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी संपूर्ण जामखेड नगरी शिवमय झाली होती. उत्सवाची सांगता दि. २७ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत भव्य ऐतिहासिक मिरवणुकीने झाली.
उत्सवाची सुरुवात दि. २३ जून रोजी विनोदसम्राट ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा) यांच्या विनोदी शैलीतील कीर्तनाने झाली. दि. २४ जून रोजी भागवताचार्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (केज) यांनी प्रभावी भागवत कीर्तनातून समाजप्रबोधन केले. दि. २५ जून रोजी शिवशाहीर पृथ्वीराज माळी (सांगली) यांच्या जोशपूर्ण पोवाड्यांनी आणि शौर्यगाथांनी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले.

दि. २६ जून हा दिवस सामाजिक बांधिलकीचा ठरला. सकाळी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल १७२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. सायंकाळी कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणीताई परांजपे-माने (पुणे) यांनी “राजमाता जिजाऊ – महिला सक्षमीकरण” या विषयावर प्रभावी कीर्तनातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. ‘मुलगी वाचवा, समाजात सकारात्मक बदल घडवा’ हा संदेश उपस्थितांच्या मनावर ठसला.

उत्सवादरम्यान दररोज शिवप्रेमी, माता-भगिनी आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पावसाची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. शिवमहाप्रसादाचेही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. यावेळी श्री शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने जामखेड तालुक्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, सैन्य व पोलीस दलात भरती झालेले युवक, शासकीय सेवेत रुजू झालेले अधिकारी तसेच आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शिवराज्याभिषेक दिनी शिवमय पहाट
दि. २७ जून रोजी पहाटे पाच वाजता सप्तनद्या, गडकोट आणि विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र जलाने तसेच वेदमंत्रांच्या घोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला. या पवित्र सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. संपूर्ण परिसर शिवनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

दुपारी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथून श्री गणेशाच्या आरतीने भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. अश्वपथक, ध्वजपथक, हलगी पथक, धर्मयोद्धा ढोल पथक, राजस्थानातील वाद्यपथक, लाठी-काठी व शस्त्र प्रात्यक्षिक पथक, देव मामलेदार बँजो पथक तसेच अहिल्यानगर येथील रोप मल्लखांब मुलींच्या पथकाने आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

मिरवणुकीतील हत्तीवरील छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती, मारुती बैठकीतील हनुमान मूर्ती, धर्मवीर संभाजी महाराजांची आकर्षक मूर्ती, मराठा आरमाराचे जहाज, अश्वारूढ शिवाजी महाराज व बालशंभूराजे, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा हुबेहूब देखावा, ‘परस्त्री मातेसमान’ हा सामाजिक संदेश देणारा देखावा तसेच येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची भव्य प्रतिकृती यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. बीड कॉर्नर येथे हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत सामूहिक महाआरती पार पडली.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारित जिवंत देखावा हा मिरवणुकीतील सर्वात प्रभावी आणि अंगावर शहारे आणणारा भाग ठरला. या सादरीकरणाने इतिहास जणू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा ठाकल्याचा अनुभव उपस्थितांना आला. श्री शिवराज्याभिषेक उत्सवाचे हे सलग चौदावे वर्ष असून सर्व शिवप्रेमींनी निस्वार्थ भावनेने एकत्र येत हा उत्सव यशस्वी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here