

जामखेड शहरात भरधाव पिकअपच्या धडकेत युवकाचा मृत्यू
रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे आणखी एका निष्पाप युवकाचा बळी; नागरिकांमधून तीव्र संताप
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील बीड रोडवरील मुंढे हॉस्पिटलसमोर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सिद्धेश्वर गणेश म्हेत्रे (वय ३२, रा. मुंजोबा गल्ली, जामखेड) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोटारसायकलवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिद्धेश्वर म्हेत्रे यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे जामखेड शहरावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातानंतर जामखेड शहरातून जाणाऱ्या रखडलेल्या जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यातच रस्त्यालगत वाढलेली अतिक्रमणे, अपुरी वाहतूक नियोजन व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर गणेश म्हेत्रे हा युवक बीड रोडवरील मुंढे हॉस्पिटलसमोर आपल्या मोटारसायकलवर रस्त्याच्या कडेला उभा होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्याच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की युवक गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जामखेड शहरात शोककळा पसरली असून, मृत युवकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम, शहरातील वाढते अतिक्रमण आणि वाहतुकीतील गंभीर त्रुटींमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या परिस्थितीमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक जण कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे गेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व जीवितहानी होत असतानाही संबंधित विभाग आणि प्रशासन मात्र उदासीन असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सिद्धेश्वर गणेश म्हेत्रे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी प्रशासन, संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी जागे होऊन जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, शहरातील अतिक्रमणे हटवावीत आणि वाहतुकीसंदर्भात प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी जामखेडकरांकडून करण्यात येत आहे.

चौकट
आणखी किती बळी?
रस्त्याचे अपूर्ण काम आणि पार्किंगच्या अभावामुळे रस्त्यावर वाहने उभी राहत असून, त्यातून आज आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला. नियमानुसार अतिक्रमण हटवून महामार्गाचे काम वेळेत व योग्य पद्धतीने पूर्ण झाले असते, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती. अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
अवधूत पवार (सामाजिक कार्यकर्ते)









