Home ताज्या बातम्या नागपंचमी उत्सवासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा देणार; बीड रोडवरील एमआयडीसी मैदानावर भरणार आनंदमेळा-प्रांजलताई...

नागपंचमी उत्सवासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा देणार; बीड रोडवरील एमआयडीसी मैदानावर भरणार आनंदमेळा-प्रांजलताई चिंतामणी

 

नागपंचमी उत्सवासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा देणार; बीड रोडवरील एमआयडीसी मैदानावर भरणार आनंदमेळा-प्रांजलताई चिंतामणी

शांतता कमिटीची बैठक जागेच्या प्रश्नावरून ठरली वादग्रस्त

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहराचे ग्रामदैवत व राज्यात नावलौकिक प्राप्त असलेल्या श्री नागेश्वर पंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने शहरात येणाऱ्या भाविक व नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नागपंचमी उत्सवानिमित्त बीड रोडवरील प्रशस्त एमआयडीसी मैदानावर आनंदमेळा भरविण्याची तयारी करण्यात आली आहे. आनंदमेळ्याच्या जागेचा यावर्षी लिलाव केला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांच्या हिताचा विचार करून उत्सवाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी दिली.

पंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच आनंदमेळ्याच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीस तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगराध्यक्ष प्रतिनिधी अमित चिंतामणी, सभापती शरद कार्ले, अजय काशिद, नगरसेवक श्रीराम डोके, पवन राळेभात, ॲड. प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अर्जुन म्हेत्रे, तात्याराम पोकळे, मनोज कुलकर्णी, विनायक राऊत, अवधूत पवार, राहुल उगले, कुंडल राळेभात, विकीभाऊ सदाफुले, प्रदीप टापरे, संतोष नवलाखा, डिगांबर चव्हाण, संपत राळेभात, सुनील जगताप, बाबा चंदन, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आनंदमेळ्याच्या जागेवरून मतभेद
बैठकीदरम्यान पंचमी उत्सवातील आनंदमेळा नेमका कोणत्या ठिकाणी भरविण्यात यावा, यावरून मतभेद समोर आले. नगरपरिषदेच्या वतीने बीड रोडवरील एमआयडीसीच्या मैदानावर आनंदमेळा भरविण्याची तयारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी बाजार समितीच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून पंचमीचा आनंदमेळा भरविला जात असून, तेथे कोणत्याही प्रकारची मोठी अडचण निर्माण झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही बाजार समितीच्या आवारातच आनंदमेळा भरविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आनंदमेळ्याच्या जागेवरून चर्चा सुरू असताना बैठकीत काही वेळ वातावरण तापले. मुख्याधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे शांतता कमिटीची बैठक काही काळ गोंधळाच्या वातावरणात पार पडली.

यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी स्पष्ट केले की, पंचमी उत्सव हा जामखेडच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवात नागरिकांच्या आनंदाचा व सुविधांचा विचार करून यावर्षी आनंदमेळ्यासाठी जागेचा लिलाव केला जाणार नाही. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषद आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शांतता कमिटीची बैठक असल्याने सर्वांनी आपापले प्रश्न व सूचना शांततेच्या वातावरणात मांडाव्यात. मुद्दे भांडणाच्या स्वरूपात न मांडता सुज्ञपणे चर्चा करावी. सर्वांच्या सूचनांचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आवाहनही नगराध्यक्षा चिंतामणी यांनी केले. पंचमी उत्सवाच्या काळात महिलांना तसेच नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणींची नगरपरिषदेला जाणीव असून, त्या समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद सक्षमपणे काम करेल. उत्सव काळात नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तहसीलदार तसेच मुख्याधिकारी प्रतिनिधी यांना बैठकीत बोलण्याची पुरेशी संधी देण्यात आली नसल्याचा आरोप काही उपस्थितांनी केला. सदर प्रशासकीय अधिकारी कोणाच्या दबावाखाली होते?, असा सवालही उपस्थित करण्यात आला. नगरपरिषदेने आनंदमेळ्याच्या जागेबाबत एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत, बीड रोडवरील एमआयडीसी मैदान नागरिकांना मान्य नसल्याचे काही नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. या जागेवर जाण्या-येण्याची तसेच सुरक्षेची व्यवस्था योग्य राहणार नाही, त्यामुळे आनंदमेळ्याची जागा बदलण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक प्रशांत राळेभात, ॲड. मयूर डोके, सुनील जगताप, संतोष नवलाखा, संपत राळेभात, प्रदीप टापरे आणि विकीभाऊ सदाफुले यांनी केली.

पंचमीचा आनंदमेळा केवळ एका ठिकाणी न भरविता शहरातील आणखी दोन-तीन ठिकाणी भरविण्यास परवानगी मिळावी, यासाठीही प्रयत्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात आनंदमेळ्याची अंतिम जागा कोणती असणार, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे. पंचमी उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक व नागरिक शहरात येत असल्याने वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, पिण्याचे पाणी, महिला व नागरिकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था या सर्व बाबींवर प्रशासन व नगरपरिषदेला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, तसेच आनंदमेळ्याच्या जागेबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!