जामखेड प्रतिनिधी

‘मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने अध्यादेश काढणे आणि नंतर त्याचा कायदा करून घेणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. मात्र, तोपर्यंत राज्य सरकारने या प्रक्रियेला मदत करताना जे आपल्या हातात आहे, ते मराठा समाजाला द्यावे. या लढ्यातून मला स्वत:ला काहीही साध्य करायचे नाही. राज्यातील ७० टक्के मराठा समाज गरीब आहे, त्यांच्यासाठी आपला हा लढा सुरू आहे,’ असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज जामखेडमध्ये सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी काढलेला संवाद दौरा शुक्रवार दि. २ रोजी दुपारी जामखेड इथं आला, तेव्हा ते बोलत होते. जामखेडकरांनी संभाजीराजेंचे जोरदार स्वागत केले. सभेसाठीही मोठी गर्दी केली होती. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी सभेला उपस्थित होते. त्यांचा संभाजीराजे यांनी आवर्जून उल्लेख केला.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की ‘सर्वपक्षीय नेते एकत्र आले तर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होतील. ३० टक्के समाज श्रीमंत असेल, त्यांना काही नको. मलाही यातून काही मिळवायचे नाही. ७० टक्के मराठा समाज गरीब आहे. त्यांच्यासाठी सवलती हव्या आहेत. आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी जे आरक्षण दिले होते, ते सर्व समाजातील गरीबांसाठी होते. त्यांच्याच आदर्श घेऊन आम्हाला बहुजन समाज जोडायचा आहे. मराठा समाजाला तेव्हा मिळालेले आरक्षण नंतर मागे पडले. ते मिळविण्यासाठी आता लढा सुरू आहे.’

‘आरक्षणाचे मार्ग बंद झाले नाहीत’
‘मराठा आरक्षण लढ्यात आतापर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या. शेवटचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असे असले तरी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत. केंद्र सरकराने यासाठी अध्यादेश काढावा. त्यानंतर हा कायदा मंजूर करून घ्यावा, हा पर्याय खुला आहे. त्याला काही अवधी लागू शकतो. त्या काळात राज्य सरकारने त्यांच्या हातात जे देता येणे शक्य आहे, ते द्यावे. त्यामुळे पूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चांतील मागण्यांपैकी सहा प्रमुख मागण्या आम्ही पुढे ठेवल्या आहेत. त्यातीलच सारथी संस्थेसंबंधीची आहे. राज्यात जशी बार्टी, महाज्योती या संस्था विविध समाजासाठी आहेत, तशीच सारथीही सक्षम व्हावी, अशी आमची मागणी आहे. आरक्षण मिळेपर्यंत या संस्थेमार्फत काही लाभ गरीब मराठा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे,’ असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

यावेळी विविध पक्षांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या वतीने माजी मंत्री भाजपा राज्य उपाध्यक्ष राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी दत्तात्रय वारे, राहुल उगले (राष्ट्रीय काँग्रेस), संजय काशीद (शिवसेन), सचिन उगले (प्रहार संघटन) मंगेश आजबे (स्वाभिमानी शेतकरी संघटना) हवा सरनोबत, प्रदीप टापरे (मनसे) यांचा समावेश होता. तर सभापती सूर्यकांत मोरे, विकास राळेभात, ॲड. अरुण जाधव ,नामदेव राळेभात, कुंडल राळेभात, पवन राळेभात, प्रा. लक्ष्मण ढेपे, अवधूत पवार, राम निकम, गुलाब जांभळे, ॲड हर्षल डोके, अमित जाधव, शहाजी डोके, आदीसह हजारो नागरिक उपस्थित होते ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here