जामखेड ग्रामीण रुग्णालयचा कारभार राम भोरोसे! सरकारी सेवेत असणाऱ्या डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करणे नियमबाह्य

राष्ट्रवादी काँग्रेस कडून तहसिलदार यांना दिले निवेदन.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खाजगी हॉस्पीटल असल्याने ते उपस्थित राहत नाही. रुग्णांना औषधे मिळत नसल्याने बाहेरून विकत घ्यावी लागतात, वैद्यकीय अधिक्षक वेळेवर येत नाही तसेच कर्मचाऱ्यांत समन्वय नसल्याने नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने युवक नेते रमेश आजबे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिवशंकर वलांडे यांना घेराव घालून दिड तास जाब विचारला यानंतर तहसीलदार यांच्यासमोर वरीष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला.

आठ दिवसांत ग्रामीण रुग्णालयाची परस्थितीत न सुधारल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जामखेड शहरातील ग्रामीण रुग्णालय नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित दादा पवार नियुक्त ग्रामीण रुग्णालय जामखेड सदस्य रमेश आजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, युवक तालुका अध्यक्ष काकासाहेब राळेभात, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक विभीषण धनवडे, शहरी युवक अध्यक्ष वसीम सय्यद, राजेंद्र गोरे, हरीभाऊ आजबे, प्रवीण उगले, समीर चंदन, सचिन शिंदे, संजय डोके, गणेश घायतडक, आसिफ शेख व बिलाल शेख यासह असंख्य कार्यकर्ते सोमवारी ग्रामीण रुग्णालयात आले यावेळी तेथे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिवशंकर वलांडे आले असता त्यांना घेराव घालून रूग्णालयाची व्यथा मांडली, आठ दिवसापूर्वी आम्ही ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुशिल मोराळे यांना निवेदन देऊन कारभार सुधारण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले.

ग्रामीण रुग्णालय वर्षभरापासून येथील जुन्या पंचायत समितीच्या इमारतीत आले आहे. याच ठिकाणी आपला दवाखाना आहे. येथे तीन वैद्यकीय अधिकारी, अधिक्षक, परिचारिका असा मिळून २९ जणांचा स्टाफ आहे. अनेक गोरगरीब गरजु या ठिकाणी उपचारासाठी येतात. सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ७ अशी ओपिडी असते. तीन वैद्यकीय अधिकारी असताना एकही उपस्थित नसतो. वैद्यकीय अधिकारी नियमितपणे व वेळेवर उपस्थित राहत नाहीत.

यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यात विलंब होतो आणि अनेक वेळा त्यांना खासगी दवाखान्यांचा पर्याय निवडावा लागतो, जे सर्वसामान्य जनतेस परवडणारे नाही. या समस्येमुळे जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व आपत्कालीन रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य सुविधा ही प्राथमिक गरज असून ग्रामीण भागातील नागरिकांना ही सेवा वेळेवर मिळावी अशी मागणी केली. वैद्यकीय अधिकारी आपत्कालीन सेवा किंवा ऑन-कॉल ड्युटीवर असल्याचे सांगून रुग्णालयात प्रत्यक्ष उपस्थित राहत नाहीत. याउलट, ते खासगी दवाखान्यांमध्ये सेवा देताना आढळून येतात. ही बाब केवळ रुग्णालयीन सेवांची गुणवत्ता कमी करतेच, परंतु गरजू व अत्यावश्यक उपचाराची प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण करते. सरकारी सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस करणे हे नियमबाह्य असून यामुळे सरकारी वैद्यकीय व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास कमी होतो.

सर्व प्रकारची औषधे वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेक वेळा रुग्णांना बाहेरून महागडी औषधे विकत घेण्याची वेळ येते, जी अनेक गरजू रुग्णांना परवडत नाही. ग्रामीण व मागास भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय एकमेव उपचार केंद्र आहे. त्यामुळे येथे सर्वसामान्य व विशेष प्रकारच्या औषधांचा पुरेसा साठा कायमस्वरूपी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी करून जर रुग्णालयाची परस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला व निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here