बालरंगभूमीच्या ‘जल्लोष लोककलेचा’ या एकदिवसीय लोककला कार्यशाळेस बाल कलाकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद.
अहमदनगर : येथील बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातही बालरंगभूमी परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नव्या पिढीवर लोककला संस्कार घडावेत, ते केवळ मनोरंजना पुरतेच मर्यादित न राहता त्याची माहीती, आवड त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून ‘सखोल माहिती ते सादरीकरण’अशा दोन भागात कार्यशाळा दिनांक 4 ऑगस्ट रोजी माऊली संकुल येथे उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, कार्यकारणी सदस्य श्री. अनंत जोशी, मराठी नाट्य परिषद उपनगर शाखेचे अध्यक्ष श्री. प्रसाद बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सौ. उर्मिला लोटके यांनी प्रास्ताविक करून या कार्यशाळेच्या उपक्रमाची तसेच बालरंगभूमी परिषदेची उद्दिष्टे आणि धेय्य याबद्दल माहिती दिली. मध्यावर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी नियोजित बालनाट्य संमेलन, लोक जागर महोत्सवाची तयारी सुरू असल्याची माहिती दिली.
या कार्यशाळेत लोककलांचा प्राचीन इतिहास ते जपणूक या विषयावर प्रसिद्ध शाहीर,गीतकार श्री. विलास अटक यांनी माहिती देत उपस्थित मुलांना संवादिनी, ढोलकी, एक तारा टाळ ई. वाद्यांचे मार्गदर्शन केले. तर श्री. अनंत द्रविड यांनी विविध लोकनृत्याचीं मुलांना प्रात्यक्षिकासह ओळख करून दिली. नृत्य प्रशिक्षक श्री. सागर अलचेट्टी व श्रावणसखी ग्रुपच्या श्रीमती. श्रेया देशमुख यांनी महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी, धनगरी, शेतकरी, दिंडी, गोंधळ, लावणी, आदिवासी, भलरी, मंगळागौरीचे खेळ ई. नृत्य प्रकारांची माहिती देऊन मुलांकडून लगेच ते सगळे नृत्य करवून घेत शिबिरात मजा आणली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष श्री लोटके यांनी अलिकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीच्या भडीमारापुढे आपल्या लोककला दुर्लक्षित व लोप पावत आहेत. या लोककलेची जपणूक व्हावी, त्यांना अधिक ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी या जाणीवेतून बालरंगभूमी परिषदेने हा विशेष उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले. कार्यकारणी सदस्य श्री. अनंत जोशी यांनी अहमदनगर शाखा राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तेजा पाठक यांनी केले तर प्रसाद भणगे यांनी आभार मानले. यावेळी सुजाता पायमोडे, टिना इंगळे, सोनाली दरेकर, सपना साळुंके, शैलेश देशमुख, नाना मोरे, मंगेश जोशी, विराज अडगटला यांनी शिबिर संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विविध नाट्य संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.