


मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत; तिसगावच्या खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर
शहरालगतच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. डोंगराच्या कड्यावर गेलेल्या १८ वर्षीय कुणाल मुरलीधर चांदवडे याला सुरक्षित खाली आणण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडीलही डोंगरावरून खाली पडले. या दुर्घटनेत कुणालसह त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता. तो डोंगराच्या कड्यावर बराच वेळ उभा असल्याची माहिती मिळताच त्याचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले. मुलाला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी त्यांनी त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तिसगावमधील ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. कुणालला शांत करून सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरू झाले.

तीन तास सुरू होता कुणालला समजावण्याचा प्रयत्न
कुणाल जवळपास तीन तास डोंगराच्या कड्यावर असल्याचे सांगण्यात येते. तो वारंवार आपली जागा बदलत असल्याने त्याच्याजवळ जाणे धोकादायक ठरत होते. आई त्याच्याशी सतत संवाद साधत होती. ग्रामस्थ आणि पोलीसही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.
“आईकडे बघून तरी जग,” अशा भावनिक शब्दांत ग्रामस्थांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तिसगावचे सरपंचही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनीही कुणालशी संवाद साधत त्याला खाली येण्याची विनंती केली. सरपंचांकडूनही भावनिक आवाहन कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंचांनीही त्याला भावनिक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. “तुला आयफोन 15 प्रो देतो,” असे आश्वासन देत त्यांनी कुणालला खाली येण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येते.

मात्र, या प्रयत्नांनंतरही कुणालची मनःस्थिती बदलली नाही. काही वेळाने त्याने “आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन आहे,” असे म्हटल्याचे सरपंचांनी सांगितले.
आईची आर्त विनवणीही ठरली निष्फळ कुणालचे हे शब्द ऐकल्यानंतर त्याच्या आईनेही रडत मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. “दुसरं सोल्यूशन नाही, असं का वाटतं तुला?” असे म्हणत तिने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

मात्र परिस्थिती गंभीर होत चालली होती. घटनास्थळी उपस्थित असलेले सर्वजण कुणालला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी प्रयत्न करत होते. शेवटच्या क्षणी वडील मुलाजवळ गेले. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर शेवटच्या १५ ते २० मिनिटांत कुणालचे वडील मुरलीधर हेही डोंगरावर वर गेले. मुलाला बोलण्यात गुंतवून त्याला सुरक्षितपणे पकडता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र कुणालला पकडण्याचा प्रयत्न करत असताना वडिलांचा तोल गेला आणि दोघेही डोंगरावरून खाली पडले. मुलाच्या दिशेने धाव घेत असताना आईचाही तोल गेला आणि तीही खाली पडली. उंचावरून पडल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

चांदवडे कुटुंबावर काळाचा घाला
एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने तिसगाव परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाला वाचवण्यासाठी आई-वडिलांनी केलेल्या प्रयत्नांचा शेवटही त्यांच्या मृत्यूने झाल्याने या घटनेने उपस्थित ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला.
घटनेनंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही सुरू केली असून, या दुर्घटनेची पार्श्वभूमी आणि संपूर्ण घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे.




