दिल्ली :पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील एका इमारतील शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आजुनही या आगीत 19 जण बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात आग लागली. तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय होतं.
अग्निशमन दलाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी या आधी शुक्रवारी रात्री 10 वाजता माहिती देत सांगितलं होतं की, ‘तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. आगीमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही आग इतकी भीषण होती की सुमारे आठ तास आग आणि धुरांचे लोट सर्व परिसरात पसरले होते. यानंतर एनडीआरएफच्या पथकालाही बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले.’ यानंतर बचाव पथकाला रात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत संवोदना व्यक्त केल्या आहेत, ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, ‘दिल्लीतील भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झालं आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.’